A A A A A

पाप: [व्यभिचार]


१ करिंथकर ६:१८
जारकर्माच्या प्रसंगापासून पळ काढा. जे कोणतेही दुसरे पापकर्म मनुष्य करतो, ते शरीराबाहेरून होते. परंतु जो जारकर्म करतो तो आपल्या शरीरामध्ये पाप करतो.

इब्री १३:४
लग्न सर्वस्वी आदरणीय असावे व पतिपत्नींनी एकमेकांबद्दल विश्वास बाळगावा. लैंगिक गैरव्यवहार करणारे व व्यभिचारी ह्यांचा न्याय देव करील.

जेम्स ४:१७
चांगले करणे कळत असून जो ते करत नाही, तो पाप करतो.

१ योहान १:९
मात्र जर आपण आपली पापे कबूल केली, तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून तो आपल्या पापाची क्षमा करील व सर्व अनीतिमत्त्वापासून आपल्याला शुद्ध करील.

लूक १६:१८
जो कोणी आपली पत्नी टाकून दुसरीबरोबर लग्न करतो तो व्यभिचार करतो आणि पतीने टाकलेल्या स्त्रीबरोबर जो लग्न करतो, तो व्यभिचार करतो.

मॅथ्यू १९:९
मी तुम्हांला सांगतो, जो कोणी स्वतःच्या पत्नीला विवाहबाह्य संबंधाच्या कारणाशिवाय सूटपत्र देतो व दुसरे लग्न करतो तो व्यभिचार करतो [आणि जो कोणी अशा सोडून दिलेल्या स्त्रीबरोबर लग्न करतो, तोही व्यभिचार करतो.]”

रोमन्स ७:२-३
[२] पती जिवंत आहे, तोपर्यत त्याची विवाहित स्त्री नियमशास्त्राने त्याला बांधलेली असते. पण पती मरण पावल्यावर तिची पतीच्या बंधनातून सुटका होते.[३] म्हणून पती जिवंत असताना ती परपुरुषाची झाली, तर तिला व्यभिचारिणी म्हणतील, पण पती मरण पावल्यास ती कायद्याने त्या बंधनातून मुक्त होते. नंतर ती दुसऱ्या पुरुषाची पत्नी झाली असता व्यभिचारिणी होत नाही.

मार्क १०:११-१२
[११] तेव्हा तो त्यांना म्हणाला, “जो कोणी आपल्या पत्नीला सूटपत्र देतो व दुसरे लग्न करतो तो तिच्याविरुद्ध व्यभिचार करतो,[१२] तसेच जी स्त्री आपल्या पतीला सूटपत्र देते व दुसरे लग्न करते तीही व्यभिचार करते.”

मॅथ्यू ५:२७-३२
[२७] ‘व्यभिचार करू नकोस’, असे प्राचीन लोकांना जे सांगितले होते, ते तुम्ही ऐकले आहे.[२८] परंतु मी तुम्हांला सांगतो, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे वासनेने पाहतो, त्याने त्याच्या अंतःकरणात तिच्याशी व्यभिचार केलेलाच आहे.[२९] तुझा उजवा डोळा जर तुला पापास प्रवृत्त करत असेल, तर तो उपटून टाक; कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात टाकले जावे, ह्यापेक्षा तुझ्या एका अवयवयाचा नाश व्हावा, हे तुझ्या हिताचे आहे.[३०] तुझा उजवा हात जर तुला पापास प्रवृत्त करत असेल, तर तो तोडून टाक; कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात जावे, ह्यापेक्षा तुझ्या एका अवयवयाचा नाश व्हावा, हे तुझ्या हिताचे आहे.[३१] असे सांगितले होते, “जो कोणी त्याची पत्नी टाकेल, त्याने तिला सूटपत्र द्यावे’,[३२] परंतु आता मी तुम्हांला सांगतो, जो कोणी त्याची पत्नी व्यभिचाराच्या कारणावाचून टाकतो, तो तिला व्यभिचारिणी करतो आणि जो कोणी अशा टाकलेल्या स्त्रीबरोबर लग्न करतो, तो व्यभिचार करतो.

१ करिंथकर ६:९-१६
[९] अनीतिमान माणसांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही, हे तुम्हांला ठाऊक नाही काय? फसू नका. जारकर्मी, मूर्तिपूजक, व्यभिचारी, समलिंगी, लैंगिक दृष्ट्या विकृत जन,[१०] चोर, लोभी, मद्यपी, चहाडखोर व लुटारू ह्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही[११] आणि तुमच्यापैकी कित्येक तसे होते, तरी तुम्ही आता तुमच्या पापांपासून शुद्ध झाला आहात; तुम्ही स्वतःचे समर्पण देवाला केले आहे; आपल्या प्रभू ख्रिस्ताने व आपल्या देवाच्या आत्म्याने तुमचे देवाबरोबर यथोचित संबंध प्रस्थापित केले आहेत.[१२] ज्या गोष्टींची मला कायद्याने मुभा दिली आहे त्या सर्व गोष्टी माझ्या हिताच्या असतीलच असे नाही. सर्व गोष्टींची मला मुभा आहे, तरी मी कोणत्याही गोष्टीच्या आहारी जाणार नाही.[१३] अन्न पोटासाठी व पोट अन्नासाठी आहे, तरीही त्या दोहोंचाही अंत देव करील. शरीर जारकर्मासाठी नाही, तर प्रभूसाठी आहे आणि शरीरासाठी प्रभू आहे.[१४] देवाने प्रभूला उठवले आणि तो त्याच्या सामर्थ्याने आपल्यालाही उठवील.[१५] तुमची शरीरे ख्रिस्ताचे अवयव आहेत, हे तुम्हांला ठाऊक नाही काय? तर मग मी ख्रिस्ताचे अवयव नेऊन ते वेश्येचे अवयव करावेत काय? कधीच नाही![१६] जो वेश्येशी संबंध ठेवतो, तो तिच्याबरोबर एकशरीर होतो, हे तुम्हांला ठाऊक नाही काय? कारण ‘ती दोघे एकदेह होतील’, असे धर्मशास्त्र म्हणते.

लूक १८:१८-२०
[१८] एका यहुदी अधिकाऱ्याने येशूला विचारले, “गुरुवर्य, आपण किती चांगले आहात! मी काय केल्याने मला शाश्वत जीवन वतन म्हणून मिळेल?”[१९] येशू त्याला म्हणाला, “मला चांगला का म्हणतोस? एकावाचून म्हणजे देवावाचून कोणी चांगला नाही.[२०] तुला आज्ञा ठाऊक आहेत:व्यभिचार करू नकोस; खून करू नकोस; चोरी करू नकोस; खोटी साक्ष देऊ नकोस; आपल्या वडिलांचा व आईचा सन्मान कर.”

१ थेस्सलनीकाकर ४:३-५
[३] देवाची इच्छा ही आहे की, तुमचे पवित्रीकरण व्हावे, म्हणजे तुम्ही लैंगिक अनैतिकतेपासून स्वतःस अलिप्त ठेवावे.[४] तुमच्यामधील प्रत्येकाने स्वत:च्या शरीरावर ताबा मिळवून पवित्र व सन्माननीय जीवन कसे जगावे, हे जाणून घ्यावे.[५] देवाला न ओळखणाऱ्या यहुदीतरांप्रमाणे कामवासनेने तुम्ही वागू नये.

मार्क ७:२०-२३
[२०] आणखी तो म्हणाला, “जे माणसातून बाहेर निघते, तेच माणसाला अशुद्ध करते,[२१] कारण आतून म्हणजे माणसाच्या अंतःकरणातून वाईट कल्पना निघतात.[२२] व्यभिचार, जारकर्मे, खून, चोऱ्या, लोभ, दुष्टपणा, कपट, कामातुरपणा, हेवा, निंदानालस्ती, अहंकार व मूर्खपणा,[२३] ह्या सर्व वाईट गोष्टी आतून बाहेर निघतात व माणसाला अशुद्ध करतात.”

मॅथ्यू १५:१७-२०
[१७] जे काही तोंडात जाते, ते पोटात उतरते व नंतर पुढे शरीराबाहेर टाकण्यात येते, हे तुम्हांला समजत नाही काय?[१८] मात्र जे तोंडातून निघते ते अंतःकरणातून येते व माणसाला अशुद्ध करते.[१९] अंतःकरणातूनच दुष्ट कल्पना, खून, व्यभिचार आणि लैंगिक अनैतिकता, तसेच चोऱ्या, खोट्या साक्षी व निंदानालस्ती निघतात.[२०] ह्या गोष्टी माणसाला अशुद्ध करतात. न धुतलेल्या हातांनी जेवणे माणसाला अशुद्ध करत नाही.”

जॉन ८:४-११
[४] “गुरुजी, ही स्त्री प्रत्यक्ष व्यभिचार करत असताना धरण्यात आली.[५] मोशेने नियमशास्त्रात आम्हांला अशी आज्ञा दिली आहे की, अशांना दगडमार करावा, तर आपण हिच्याविषयी काय म्हणता?”[६] त्याला दोष लावायला आपल्याला काहीतरी मिळावे म्हणून त्याची परीक्षा पाहण्याकरता ते असे म्हणाले. परंतु येशू ओणवा होऊन बोटाने जमिनीवर लिहू लागला.[७] ते त्याला एकसारखे प्रश्न विचारत असता, तो उभा राहून त्यांना म्हणाला, “तुमच्यांत जो निष्पाप असेल त्याने प्रथम तिला दगड मारावा.”[८] तो पुन्हा ओणवा होऊन जमिनीवर लिहू लागला.[९] हे ऐकून वयोवृद्ध माणसांपासून सुरुवात करून शेवटच्या माणसापर्यंत ते सर्व एक एक असे निघून गेले. येशू एकटा राहिला आणि ती स्त्री तेथेच मध्ये उभी होती.[१०] येशू पुन्हा उभा राहून तिला म्हणाला, “बाई, तुला दोष देणारे कोठे आहेत? तुला कोणी दोषी ठरवले नाही काय?”[११] ती म्हणाली, “प्रभो, कोणी नाही.” तेव्हा येशू तिला म्हणाला, “मीही तुला दोषी ठरवत नाही, जा, ह्यापुढे पाप करू नकोस.”]

१ करिंथकर ७:१-४०
[१] तुम्ही मला ज्या बाबींविषयी लिहिले त्यांविषयी मी उत्तर देत आहे. पुरुषाने स्त्रीला स्पर्श न क रणे बरे.[२] परंतु अनैतिकता इतकी बोकाळत आहे म्हणून प्रत्येक पुरुषाला स्वतःची पत्नी असावी आणि प्रत्येक स्त्रीला स्वतःचा पती असावा.[३] पतीने पत्नीला तिचा हक्क द्यावा आणि त्याप्रमाणे पत्नीनेही पतीला द्यावा व एकमेकांचे समाधान करावे.[४] पत्नीला स्वतःच्या शरीरावर अधिकार नाही तर तो अधिकार तिच्या पतीला आहे आणि त्याचप्रमाणे पतीलाही स्वतःच्या शरीरावर अधिकार नाही तर तो त्याच्या पत्नीला आहे.[५] एकमेकांना नकार देऊ नका, तरी प्रार्थना करता यावी म्हणून पाहिजे असल्यास काही वेळ परस्पर संमतीने एकमेकांपासून दूर राहा. मग पुन्हा एकत्र व्हा, अशा हेतूने की, तुमच्या असंयमामुळे सैतानाने तुम्हांला मोहात पाडू नये.[६] मी हे आज्ञा म्हणून सांगत नाही, तर एक सवलत म्हणून सांगतो.[७] खरे म्हणजे मी जसा आहे तसे सर्व माणसांनी असावे, अशी माझी इच्छा आहे. तरी प्रत्येकाला ज्याचे त्याचे कृपादान देवाकडून मिळाले आहे, एकाला एका प्रकारचे व दुसऱ्याला दुसऱ्या प्रकारचे.[८] आता जे अविवाहित व ज्या विधवा आहेत त्यांना मी म्हणतो की, माझ्यासारखे एकटे राहिलात तर ते तुमच्यासाठी बरे.[९] तथापि जर तुम्हांला संयम बाळगता येत नसेल, तर तुम्ही लग्न केलेले बरे. कामवासनेने जळत राहण्यापेक्षा लग्न करणे चांगले आहे.[१०] परंतु विवाहितांना मी आज्ञा करतो, मी नव्हे तर प्रभू करतो की, पत्नीने पतीपासून वेगळे होऊ नये.[११] परंतु ती वेगळी झालीच तर तिने लग्न केल्यावाचून राहावे किंवा पतीबरोबर समेट करावा आणि पतीनेही पत्नीला सोडू नये.[१२] इतरांना, प्रभू नव्हे तर मी म्हणतो की, जर एका बंधूची पत्नी ख्रिस्तीतर असली आणि ती त्याच्याजवळ नांदायला राजी असली, तर त्याने तिला घटस्फोट देऊ नये[१३] आणि ज्या स्त्रीचा पती ख्रिस्तीतर असून तिच्याजवळ राहायला राजी असेल, तर त्याला तिने घटस्फोट देऊ नये.[१४] कारण पत्नीच्याद्वारे ख्रिस्तीतर पती पवित्र झाला आहे आणि ख्रिस्ती पतीच्याद्वारे ख्रिस्तीतर पत्नी पवित्र झाली आहे. असे नसते तर त्यांची मुलेबाळे अपवित्र असती. परंतु आता ती पवित्र आहेत.[१५] तथापि जर ख्रिस्तीतर व्यक्ती वेगळी होऊ पाहते, तर ती वेगळी होवो, अशा प्रसंगी ख्रिस्ती बंधू किंवा भगिनी बांधील नाहीत. देवाने आपल्याला शांतीत राहण्याकरता पाचारण केले आहे;[१६] कारण पत्नी, तू आपल्या पतीला तारशील किंवा नाही, हे तुला काय ठाऊक? किंवा पती, तू आपल्या पत्नीला तारशील किंवा नाही, हे तुला काय ठाऊक?[१७] ते काहीही असो, प्रत्येकाला प्रभूने नेमून दिलेले जीवन आणि प्रत्येकाला देवाने केलेले पाचारण ह्यानुसार त्याने चालावे. सर्व ख्रिस्तमंडळ्यांना मी हाच नियम घालून देतो.[१८] सुंता झालेल्या कोणा मनुष्याला पाचारण झाले आहे काय? तर त्याने सुंतेच्या खुणा काढून टाकू नयेत; कोणा सुंता न झालेल्या मनुष्याला पाचारण झाले आहे काय? तर त्याने सुंता करून घेऊ नये.[१९] सुंता होणे किंवा सुंता न होणे ह्याला काही महत्त्व नाही तर देवाच्या आज्ञा पाळणे, हेच सर्वांत महत्त्वाचे आहे.[२०] ज्याला ज्या स्थितीत पाचारण झाले असेल, त्याने त्याच स्थितीत राहावे.[२१] तू गुलाम असता, तुला पाचारण झाले आहे काय? हरकत नाही, पण तुला स्वतंत्र होता येत असेल तर खुशाल स्वतंत्र हो;[२२] कारण गुलाम असून ज्याला प्रभूमध्ये पाचारण झाले आहे, तो गुलामगिरीतून स्वतंत्र केलेला प्रभूचा मनुष्य आहे. तसेच स्वतंत्र असताना ज्याला पाचारण झाले आहे तो ख्रिस्ताचा दास आहे.[२३] तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात म्हणून माणसांचे गुलाम होऊ नका.[२४] बंधुजनहो, ज्या स्थितीत पाचारण झाले असेल त्या स्थितीतच प्रत्येकाने देवाच्या सहवासात राहावे.[२५] कुमारिकांविषयी मला प्रभूची आज्ञा नाही, तथापि ज्या प्रभूने त्याच्या कृपेने मला विश्‍वासपात्र ठरवले आहे, तो मी आपले मत सांगतो.[२६] सध्याच्या संकटाच्या परिस्थितीत जो ज्या स्थितीत असेल, त्या स्थितीत त्याने राहावे, हे त्याला बरे.[२७] तू पत्नीला बांधील आहेस काय? असलास तर मुक्त होण्याचा प्रयत्न करू नकोस. तू पत्नीपासून विभक्त झाला आहेस काय? असलास तर लग्न करण्याचा विचार करू नकोस.[२८] तथापि तू लग्न केलेस म्हणजे पाप केलेस, असे होत नाही. तसेच कुमारिकेने लग्न केले म्हणून तिने पाप केले, असेही होत नाही, मात्र अशांना ह्या जीवनात हालअपेष्टा भोगाव्या लागतील. अशा हालअपेष्टा तुम्हांला भोगाव्या लागू नयेत, अशी माझी इच्छा आहे.[२९] बंधुजनहो, मला हेच सांगायचे आहे की, नेमलेला काळ कमी करण्यात आला आहे म्हणून ह्यापुढे ज्याला पत्नी आहे, त्याने ह्यापुढे ती नसल्यासारखे राहावे.[३०] जे रडतात त्यांनी रडत नसल्यासारखे, जे आनंद करतात त्यांनी आनंद करीत नसल्यासारखे, जे विकत घेतात त्यांनी आपणाजवळ काही नसल्यासारखे[३१] आणि जे ह्या जगाचा उपयोग करतात त्यांनी त्याचा उपयोग पूर्णपणे करीत नसल्यासारखे राहावे कारण ह्या जगाचे बाह्यस्वरूप लयास जात आहे.[३२] तुम्ही निश्चिंत असावे, अशी माझी इच्छा आहे. अविवाहित पुरुष, प्रभू कसा संतुष्ट होईल, अशी चिंता करतो.[३३] परंतु विवाहित पुरुष आपल्या पत्नीला कसे संतुष्ट करावे, अशा भौतिक गोष्टींची चिंता करतो. ह्यामुळे त्याचे मन द्विधा झालेले असते.[३४] जी अविवाहित किंवा कुमारी आहे ती आपण शरीराने व आत्म्यानेही पवित्र व्हावे, अशी काळजी करते. परंतु जी विवाहित आहे ती आपण आपल्या पतीला कसे संतुष्ट करावे अशा सांसारिक गोष्टींविषयी उत्सुकता बाळगते.[३५] तुमच्यावर बंधने आणण्यासाठी नव्हे तर तुमच्याकडून उत्तम आचरण घडावे व प्रभूची एकाग्रतेने सेवा व्हावी म्हणून मी हे तुमच्या हितासाठी सांगतो.[३६] परंतु जर कोणाला असे वाटत असेल की, वाङ्निश्चय केलेल्या कुमारिकेबरोबर आपण अयोग्य प्रकारे वागतो आणि जर त्याच्या भावना अनावर होत असतील, तर त्याने लग्न करावे; तो पाप करत नाही.[३७] तथापि जो अंतःकरणाने स्थिर आहे, ज्याला संयम आहे, ज्याचा आपल्या इच्छेवर ताबा आहे आणि त्या कुमारिकेला तसेच राहू द्यावे असे ज्याने आपल्या अंतःकरणात ठरवले आहे, तो योग्य करतो.[३८] जो त्या कुमारिकेबरोबर लग्न करतो तो योग्य करतो आणि जो लग्न करत नाही, तो अधिक योग्य करतो.[३९] पती जिवंत आहे, तोपर्यंत पत्नी बांधील आहे. पती मरण पावल्यावर तिची इच्छा असेल त्याच्याबरोबर, पण केवळ ख्रिस्ती माणसाबरोबर, लग्न करायला ती मोकळी आहे.[४०] पण जर ती तशीच राहील तर माझ्या समजुतीप्रमाणे ती अधिक सुखी होईल. मलाही पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन लाभते, असे मला वाटते.

Marathi Bible (BSI) 2018
The Bible Society of India