A A A A A

पाप: [व्यभिचार]


१ करिंथकर ६:१८
जारकर्माच्या प्रसंगापासून पळ काढा. जे कोणतेही दुसरे पापकर्म मनुष्य करतो ते शरीराबाहेरून होते; परंतु जो जारकर्म करतो तो आपल्या शरीराबाबत पाप करतो.

निर्गम २०:१४
व्यभिचार करू नकोस

इब्री १३:४
लग्न सर्वस्वी आदरणीय असावे व अंथरूण निर्दोष असावे; जारकर्मी व व्यभिचारी ह्यांचा न्याय देव करील.

जेम्स 4:17
चांगले करणे कळत असून जो ते करत नाही त्याचे ते पाप आहे.

यिर्मया 13:27
तुझे व्यभिचार, तुझे खिदळणे, तुझ्या जारकर्माचे चाळे, ही तुझी घोर कर्मे मी त्या मैदानातल्या टेकड्यांवर पाहिली आहेत. हे यरुशलेमे, तू हायहाय करणार! तू आपणाला शुद्ध करणार नाहीस काय? असे कोठवर चालणार?”

१ योहान १:९
जर आपण आपली पापे पदरी घेतली, तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील, व आपल्याला सर्व अनीतीपासून शुद्ध करील.

लूक १६:१८
जो कोणी आपली बायको टाकून दुसरीबरोबर लग्न करतो तो व्यभिचार करतो; आणि नवर्‍याने टाकलेल्या बायकोबरोबर जो लग्न करतो तो व्यभिचार करतो.

मॅथ्यू १९:९
मी तुम्हांला सांगतो की, जो कोणी आपल्या बायकोला जारकर्माच्या कारणाशिवाय टाकून दुसरी करतो तो व्यभिचार करतो; [आणि जो कोणी अशा टाकलेल्या स्त्रीबरोबर लग्न करतो तोही व्यभिचार करतो.]”

नीतिसूत्रे ६:३२
स्त्रीशी जारकर्म करणारा अक्कलशून्य आहे. जो आपल्या जिवाचा नाश करून घेऊ पाहतो तो असे करतो.

रोमन्स ७:२-३
[२] पती जिवंत आहे तोपर्यंत त्याची विवाहित स्त्री नियमशास्त्राने त्याला बांधलेली असते; पण पती मरण पावल्यावर तिची पतिबंधनातून सुटका होते.[३] म्हणून पती जिवंत असताना ती परपुरुषाची झाली तर तिला व्यभिचारिणी म्हणतील, पण पती मरण पावल्यास ती त्या बंधनातून मुक्त होते; नंतर ती दुसर्‍या पुरुषाची पत्नी झाली असताही व्यभिचारिणी होत नाही.

मार्क १०:११-१२
[११] तेव्हा तो त्यांना म्हणाला, “जो कोणी आपल्या बायकोला टाकतो व दुसरे लग्न करतो तो तिच्याविरुद्ध व्यभिचार करतो;[१२] आणि जर तिने आपल्या नवर्‍याला सोडले व दुसरे लग्न केले तर तीही व्यभिचार करते.”

मॅथ्यू ५:२७-३२
[२७] ‘व्यभिचार करू नकोस’ म्हणून [पूर्वी त्यांनी] सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे.[२८] मी तर तुम्हांला सांगतो, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहतो त्याने आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे.[२९] तुझा उजवा डोळा तुला पापास प्रवृत्त करत असेल तर तो उपटून टाकून दे; कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात टाकले जावे ह्यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचे आहे.[३०] तुझा उजवा हात तुला पापास प्रवृत्त करत असेल तर तो तोडून टाकून दे; कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात पडावे, ह्यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचे आहे.[३१] ‘कोणी आपली बायको टाकली तर त्याने तिला सूटपत्र द्यावे’ हेही सांगितले होते.[३२] मी तर तुम्हांला सांगतो की, जो कोणी आपली बायको व्यभिचाराच्या कारणावाचून टाकतो, तो तिला व्यभिचारिणी करतो आणि जो कोणी अशा टाकलेल्या बायकोबरोबर लग्न करतो तो व्यभिचार करतो.

१ करिंथकर 6:9-16
[9] अनीतिमान माणसांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही हे तुम्हांला ठाऊक नाही काय? फसू नका; जारकर्मी, मूर्तिपूजक, व्यभिचारी, स्त्रीसारखा संभोग देणारे, पुरुषसंभोग घेणारे,[10] चोर, लोभी, मद्यपी, चहाड व वित्त हरण करणारे1 ह्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही.[11] आणि तुमच्यापैकी कित्येक तसे होते; तरी तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात व आपल्या देवाच्या आत्म्यात धुतलेले, पवित्र केलेले व नीतिमान ठरवलेले असे झालात.[12] “सर्व गोष्टींची मला मोकळीक आहे,” तरी सर्व गोष्टी हितकारक असतातच असे नाही; “सर्व गोष्टींची मला मोकळीक आहे,” तरी मी कोणत्याही गोष्टीच्या आहारी जाणार नाही.[13] “अन्न पोटासाठी व पोट अन्नासाठी आहे;” पण त्या दोहोंचाही अंत देव करील. पण शरीर जारकर्मासाठी नाही, तर प्रभूसाठी आहे; आणि शरीरासाठी प्रभू आहे.[14] देवाने प्रभूला उठवले आणि तो आपल्या सामर्थ्याने आपल्यालाही उठवील.[15] तुमची शरीरे ख्रिस्ताचे अवयव आहेत हे तुम्हांला ठाऊक नाही काय? तर मग मी ख्रिस्ताचे अवयव नेऊन ते कसबिणीचे अवयव करावेत काय? कधीच नाही![16] जो कसबिणीशी जडला तो व ती एकशरीर आहेत, हे तुम्हांला ठाऊक नाही काय? कारण “ती दोघे एकदेह होतील” असे तो म्हणतो.

लूक १८:१८-२०
[१८] कोणाएका अधिकार्‍याने त्याला विचारले, “अहो उत्तम गुरूजी, काय केल्याने मला सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल?”[१९] येशू त्याला म्हणाला, “मला उत्तम का म्हणतोस? एकावाचून म्हणजे देवावाचून कोणी उत्तम नाही.[२०] तुला आज्ञा ठाऊक आहेत: ‘व्यभिचार करू नकोस, खून करू नकोस, चोरी करू नकोस, खोटी साक्ष देऊ नकोस, आपल्या बापाचा व आईचा सन्मान कर.’

१ थेस्सलनीकाकर 4:3-5
[3] कारण देवाची इच्छा ही आहे की, तुमचे पवित्रीकरण व्हावे, म्हणजे तुम्ही जारकर्मापासून स्वतःला अलिप्त ठेवावे.[4] देवाला न ओळखणार्‍या परराष्ट्रीयांप्रमाणे कामवासनेने नव्हे, तर पवित्रतेने व अब्रूने तुमच्यातील प्रत्येकाने आपल्या देहावर2 ताबा कसा ठेवावा ते समजून घ्यावे.3[5] ***

मार्क ७:२०-२३
[२०] आणखी तो म्हणाला, “जे माणसातून बाहेर निघते तेच माणसाला भ्रष्ट करते.[२१] कारण आतून म्हणजे माणसाच्या अंतःकरणातून वाईट विचार निघतात;[२२] जारकर्मे, चोर्‍या, खून, व्यभिचार, लोभ, दुष्टपणा, कपट, कामातुरपणा, हेवा, शिवीगाळ, अहंकार, मूर्खपणा.[२३] ह्या सर्व वाईट गोष्टी आतून बाहेर निघतात व माणसाला भ्रष्ट करतात.”

मॅथ्यू १५:१७-२०
[१७] जे काही तोंडात जाते ते पोटात उतरते व बाहेर शौचकूपात टाकण्यात येते, हे तुम्हांला समजत नाही काय?[१८] जे तोंडातून निघते ते अंतःकरणातून येते व माणसाला विटाळवते.[१९] कारण अंतःकरणातूनच दुष्ट कल्पना, खून, व्यभिचार, जारकर्मे, चोर्‍या, खोट्या साक्षी, शिवीगाळी ही निघतात.[२०] ह्या गोष्टी माणसाला विटाळवतात; न धुतलेल्या हातांनी जेवणे हे माणसाला विटाळवत नाही.”

नीतिसूत्रे ५:१८-२३
[१८] तुझ्या झर्‍याला आशीर्वाद प्राप्त होवो; तरुणपणी केलेल्या स्त्रीसह संतुष्ट राहा.[१९] रमणीय हरिणी, सुंदर रानशेळी ह्यांप्रमाणेच तिचे स्तन तुला सर्वदा तृप्त राखोत. तिच्या प्रेमाने तुझे चित्त मोहित होवो.[२०] माझ्या मुला, परस्त्रीने तुझे चित्त का मोहित व्हावेस? परक्या स्त्रीला तू का आलिंगन द्यावे?[२१] मनुष्याचे मार्ग परमेश्वराच्या दृष्टीसमोर आहेत; आणि तोच त्याच्या सर्व वाटा नीट करतो.[२२] दुर्जनाला त्याची स्वत:चीच दुष्कर्मे पछाडतात; तो आपल्याच पापाच्या पाशात सापडतो.[२३] त्याला शिक्षण मिळाले नाही म्हणून तो मरतो; तो आपल्या अति मूर्खपणामुळे भ्रांत होतो.

जॉन ८:४-११
[४] “गुरूजी, ही स्त्री व्यभिचार करत असताना धरण्यात आली.[५] मोशेने नियमशास्त्रात आम्हांला अशी आज्ञा दिली आहे की, अशांना दगडमार करावा; तर आपण हिच्याविषयी काय म्हणता?”[६] त्याला दोष लावायला आपणांस काहीतरी मिळावे म्हणून त्याची परीक्षा पाहण्याकरता ते असे म्हणाले. येशू तर खाली ओणवून बोटाने जमिनीवर लिहू लागला.[७] आणि ते त्याला एकसारखे विचारत असता तो उठून त्यांना म्हणाला, “तुमच्यामध्ये जो निष्पाप असेल त्याने प्रथम तिच्यावर दगड टाकावा.”[८] मग तो पुन्हा खाली ओणवून जमिनीवर लिहू लागला.[९] हे शब्द ऐकून वृद्धांतल्या वृद्धापासून तो थेट शेवटल्या माणसापर्यंत ते सर्व एकामागून एक निघून गेले; येशू एकटा राहिला आणि तेथेच ती स्त्री मध्ये उभी होती.[१०] नंतर येशू उठला व त्या स्त्रीशिवाय तेथे कोणी नाही असे पाहून तिला म्हणाला, “बाई, तुला दोष देणारे कोठे आहेत? तुला कोणी दंड ठरवला नाही काय?”[११] ती म्हणाली, “प्रभूजी, कोणी नाही.” तेव्हा येशू तिला म्हणाला, “मीही तुला दंड ठरवत नाही; जा; ह्यापुढे पाप करू नकोस.]

नीतिसूत्रे ६:२०-३५
[२०] माझ्या मुला, तू आपल्या बापाची आज्ञा पाळ, आपल्या आईची शिस्त सोडू नकोस;[२१] ती नेहमी आपल्या उराशी कवटाळून धर, ती आपल्या गळ्यात बांधून ठेव.[२२] तू चालशील तेव्हा ज्ञान तुला मार्ग दाखवील; तू निजशील तेव्हा ते तुझे रक्षण करील; तू जागा होशील तेव्हा ते तुझ्याशी बोलेल.[२३] कारण ती आज्ञा केवळ दिवा आहे व ती शिस्त केवळ प्रकाश आहे. बोधाचे वाग्दंड जीवनाचा मार्ग आहे;[२४] दुष्ट स्त्रीपासून, परस्त्रीच्या गोडबोल्या जिव्हेपासून, ती तुझे रक्षण करणारी आहेत.[२५] तू आपले चित्त तिच्या सौंदर्यास पाहून लोलुप होऊ देऊ नकोस; तिच्या नेत्रकटाक्षांना वश होऊ नकोस.[२६] कारण व्यभिचारिणीच्या संगतीने मनुष्य भाकरीच्या तुकड्याला मोताद होतो; स्वैरिणी स्त्री पुरुषाच्या अमोल जिवाची शिकार करते.[२७] मनुष्याने आपल्या उराशी विस्तव धरला तर त्याची वस्त्रे जळणार नाहीत काय?[२८] कोणी निखार्‍यावर चालला तर त्याचे पाय पोळणार नाहीत काय?[२९] जो कोणी आपल्या शेजार्‍याच्या स्त्रीशी गमन करतो तो असा आहे; जो कोणी तिला स्पर्श करतो तो निर्दोष असणार नाही.[३०] चोर भुकेला असल्यामुळे त्याने आपला जीव शांत करण्यासाठी चोरी केली तर त्याला लोक तुच्छ मानीत नाहीत;[३१] पण तो सापडला तर सातपट परत देईल; तो आपल्या घरची सर्व मालमत्ता देईल.[३२] स्त्रीशी जारकर्म करणारा अक्कलशून्य आहे. जो आपल्या जिवाचा नाश करून घेऊ पाहतो तो असे करतो.[३३] त्याला घाय व अपकीर्ती ही प्राप्त होतील; त्याची निंदा कधी पुसून जाणार नाही.[३४] कारण ईर्ष्या पुरुषास संतप्त करते; सूड उगवण्याच्या दिवशी तो गय करणार नाही.[३५] तो कसल्याही खंडणीची पर्वा करणार नाही; त्याला तू बहुत देणग्या दिल्यास तरी त्याचे समाधान होणार नाही.

नीतिसूत्रे ५:३-२२
[३] कारण परस्त्रीच्या ओठांतून मध स्रवतो, तिचे तोंड तेलापेक्षा तुळतुळीत असते;[४] तरी ती अखेरीस दवण्यासारखी कडू व दुधारी तलवारीसारखी तीक्ष्ण होते.[५] तिचे पाय मृत्यूकडे खाली जातात; तिची पावले अधोलोकास लागतात;[६] म्हणून तिला जीवनाची नीट वाट सापडत नाही; तिचे मार्ग डळमळीत आहेत, हे तिला कळत नाही.[७] तर आता मुलांनो, माझे ऐका, माझ्या तोंडची वचने सोडू नका.[८] तिच्याकडची वाट सोडून दे, तिच्या घराच्या दाराजवळ जाऊ नकोस;[९] गेलास तर तुझी अब्रू दुसर्‍यांच्या हाती जाईल; आणि तुझ्या आयुष्याचे दिवस निष्ठुरांच्या हाती जातील;[१०] तुझ्या धनाने परके गबर होतील, आणि तुझ्या श्रमाचे फळ दुसर्‍याच्या घरात जाईल;[११] आणि परिणामी तुझा देह व तुझी शक्ती क्षीण झाल्यावर तू शोक करशील;[१२] आणि मग तू येणेप्रमाणे म्हणशील: “मी शिक्षणाचा द्वेष कसा केला? माझ्या अंत:करणाने शासन कसे तुच्छ मानले?[१३] मी आपल्या शिक्षकांची वाणी ऐकली नाही, मला जे बोध करीत त्यांच्याकडे मी कान दिला नाही.[१४] मंडळी व सभा ह्यांच्यादेखत मी बहुतेक दुष्कर्मात गढलेला असे.”[१५] तू आपल्याच टाकीतले पाणी पी. आपल्या विहिरीतले वाहते पाणी पी.[१६] तुझे झरे बाहेर वाहून जावेत काय? तुझे जलाचे प्रवाह रस्त्यांवरून वाहावेत काय?[१७] ते केवळ तुझ्यासाठीच असोत; तुझ्याबरोबर दुसर्‍यांना त्यांचा उपयोग न घडो.[१८] तुझ्या झर्‍याला आशीर्वाद प्राप्त होवो; तरुणपणी केलेल्या स्त्रीसह संतुष्ट राहा.[१९] रमणीय हरिणी, सुंदर रानशेळी ह्यांप्रमाणेच तिचे स्तन तुला सर्वदा तृप्त राखोत. तिच्या प्रेमाने तुझे चित्त मोहित होवो.[२०] माझ्या मुला, परस्त्रीने तुझे चित्त का मोहित व्हावेस? परक्या स्त्रीला तू का आलिंगन द्यावे?[२१] मनुष्याचे मार्ग परमेश्वराच्या दृष्टीसमोर आहेत; आणि तोच त्याच्या सर्व वाटा नीट करतो.[२२] दुर्जनाला त्याची स्वत:चीच दुष्कर्मे पछाडतात; तो आपल्याच पापाच्या पाशात सापडतो.

१ करिंथकर ७:१-४०
[१] तुम्ही मला ज्या बाबींविषयी लिहिले त्यांविषयी: पुरुषाने स्त्रीला शिवू नये हे त्याला बरे.[२] तरी जारकर्मे होत आहेत म्हणून प्रत्येक पुरुषाला स्वत:ची पत्नी असावी, आणि प्रत्येक स्त्रीला स्वत:चा पती असावा.[३] पतीने पत्नीला तिचा हक्क द्यावा आणि त्याप्रमाणे पत्नीनेही पतीला द्यावा.[४] पत्नीला स्वत:च्या शरीरावर अधिकार नाही तर तो अधिकार तिच्या पतीला आहे; आणि त्याप्रमाणे पतीलाही स्वत:च्या शरीरावर अधिकार नाही तर तो त्याच्या पत्नीला आहे.[५] एकमेकांशी वंचना करू नका, तरी उपास व प्रार्थनेसाठी प्रसंग मिळावा म्हणून पाहिजे असल्यास काही वेळ परस्पर संमतीने एकमेकांपासून दूर राहा. मग पुन्हा एकत्र व्हा, अशा हेतूने की, तुमच्या असंयमामुळे सैतानाने तुम्हांला परीक्षेत पाडू नये.[६] तरी मी हे आज्ञा म्हणून सांगत नाही, तर सवलत म्हणून सांगतो.[७] पण मी जसा आहे तसे सर्व माणसांनी असावे अशी माझी इच्छा आहे; तरी प्रत्येकाला ज्याचे-त्याचे कृपादान देवापासून मिळाले आहे, एकाला एका प्रकारचे व दुसर्‍याला दुसर्‍या प्रकारचे.[८] जे अविवाहित व ज्या विधवा आहेत त्यांना मी म्हणतो की, तुम्ही माझ्यासारखे राहिलात तर ते तुमच्यासाठी बरे.[९] तथापि जर त्यांना संयम करता येत नसेल तर त्यांनी लग्न करावे, कारण वासनेने जळण्यापेक्षा लग्न करणे बरे.[१०] परंतु ज्यांनी लग्न केले आहे त्यांना मी आज्ञा करतो, मी नव्हे तर प्रभू करतो की, पत्नीने पतीपासून वेगळे होऊ नये;[११] परंतु ती वेगळी झालीच तर तिने लग्न केल्यावाचून राहावे किंवा पतीबरोबर समेट करावा आणि पतीनेही पत्नीला सोडू नये.[१२] इतरांना, प्रभू नव्हे तर मी म्हणतो की, जर कोणाएका बंधूची पत्नी ख्रिस्तीतर1 असली, आणि ती त्याच्याजवळ नांदायला राजी असली, तर त्याने तिला सोडू नये.[१३] आणि ज्या स्त्रीचा पती ख्रिस्तीतर2 असून तिच्याजवळ राहायला राजी असेल तर त्याला तिने सोडू नये.[१४] कारण पत्नीच्या द्वारे ख्रिस्तीतर पती पवित्र झाला आहे आणि ख्रिस्ती पतीच्या द्वारे ख्रिस्तीतर पत्नी पवित्र झाली आहे; असे नसते तर तुमची मुलेबाळे अशुद्ध असती; परंतु आता ती पवित्र आहेत.[१५] तथापि जर ख्रिस्तीतर व्यक्ती वेगळी होऊ पाहते तर ती वेगळी होवो; अशा प्रसंगी भाऊ किंवा बहीण बांधलेली नाही; देवाने आपल्याला शांतीत राहण्याकरता पाचारण केले आहे.[१६] कारण हे पत्नी, तू आपल्या पतीला तारशील किंवा नाही हे तुला काय ठाऊक? हे पती, तू आपल्या पत्नीला तारशील किंवा नाही हे तुलाही काय ठाऊक?[१७] तर जसे प्रत्येकाला प्रभूने वाटून दिले आहे, जसे प्रत्येकाला देवाने पाचारण केले आहे तसे त्याने चालावे; आणि ह्याप्रमाणे मी सर्व मंडळ्यांना नियम लावून देतो.[१८] सुंता झालेल्या कोणा मनुष्याला पाचारण झाले काय? तर त्याने सुंता न झालेला असे होऊ नये. कोणा सुंता न झालेल्या मनुष्याला पाचारण झाले काय? तर त्याने सुंता करून घेऊ नये.[१९] सुंता होणे काही नाही व सुंता न होणेही काही नाही; तर देवाच्या आज्ञा पाळणे हेच सर्वकाही आहे.[२०] ज्याला जशा स्थितीत पाचारण झाले असेल त्याने त्याच स्थितीत राहावे.[२१] तू गुलाम असता तुला पाचारण झाले काय? त्याची चिंता करू नकोस; पण तुला मोकळे होता येत असेल तर खुशाल मोकळा हो.[२२] कारण गुलाम असून ज्याला प्रभूमध्ये पाचारण झाले, तो गुलामगिरीतून मोकळा केलेला प्रभूचा मनुष्य आहे; तसेच मोकळे असताना ज्याला पाचारण झाले तो ख्रिस्ताचा दास आहे.[२३] तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात; माणसांचे गुलाम होऊ नका.[२४] बंधुजनहो, ज्या स्थितीत कोणाला पाचारण झाले असेल त्या स्थितीतच तो देवाजवळ राहो.[२५] कुमारिकांविषयी मला प्रभूची आज्ञा नाही, तथापि ज्या माझ्यावर विश्वासू होण्याची दया प्रभूकडून झाली आहे तो मी आपले मत सांगतो.[२६] ते असे की, प्रस्तुतच्या अडचणीमुळे जो ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत त्याने राहावे हे माणसाला बरे.[२७] तू पत्नीला बांधलेला आहेस काय? असलास तर मुक्त होण्यास पाहू नकोस; पत्नीपासून मुक्त आहेस काय? असलास तर पत्नी करण्यास पाहू नकोस.[२८] तथापि तू लग्न केलेस म्हणून पाप केलेस असे होत नाही. तसेच कुमारिकेने लग्न केले म्हणून तिने पाप केले असे होत नाही; तरीपण अशांना संसारात हालअपेष्टा भोगाव्या लागतील आणि अशा हालअपेष्टा तुम्हांला भोगाव्या लागू नयेत अशी माझी इच्छा आहे.[२९] बंधुजनहो, मी हेच म्हणतो की, काळाचा संक्षेप करण्यात आला आहे, ह्यासाठी की, ज्याला ज्याला पत्नी आहे त्याने त्याने ह्यापुढे ती नसल्यासारखे असावे;[३०] जे रडतात त्यांनी रडत नसल्यासारखे; जे आनंद करतात त्यांनी आनंद करत नसल्यासारखे; जे विकत घेतात त्यांनी आपल्याजवळ काही नसल्यासारखे;[३१] आणि जे ह्या जगाचा उपयोग करतात त्यांनी त्याचा उपयोग पूर्णपणे करत नसल्यासारखे असावे; कारण ह्या जगाचे बाह्य स्वरूप लयास जात आहे.[३२] तुम्ही निश्‍चिंत असावे अशी माझी इच्छा आहे. अविवाहित पुरुष, प्रभूला कसे संतोषवावे अशी प्रभूच्या गोष्टींविषयी चिंता करतो;[३३] परंतु विवाहित पुरुष आपल्या पत्नीला कसे संतोषवावे अशी जगाच्या गोष्टींविषयी चिंता करतो. येणेकरून त्याचे मन द्विधा झालेले असते.[३४] जी अविवाहित किंवा कुमारी आहे ती आपण शरीराने व आत्म्यानेही पवित्र व्हावे, अशी प्रभूच्या गोष्टींविषयीची चिंता करते; परंतु जी विवाहित आहे ती आपण आपल्या पतीला कसे संतोषवावे अशी जगाच्या गोष्टींविषयीची चिंता करते.[३५] हे मी तुमच्याच हितासाठी सांगतो; तुम्हांला फासात गुंतवावे म्हणून नव्हे तर तुमच्या हातून उत्तम आचरण व प्रभूची सेवा एकाग्रतेने व्हावी म्हणून सांगतो.[३६] परंतु जर कोणाला असे वाटते की, आपण आपल्या कुमारिकेच्या अपमानास कारण होत आहोत, ती उपवर झाली आहे आणि तसे अगत्यच आहे, तर जशी इच्छा असेल तसे त्याने करावे; तो पाप करत नाही; त्यांनी लग्न करावे.[३७] तथापि जो अंतःकरणाने स्थिर आहे, ज्याला अगत्य नाही, ज्याचा आपल्या इच्छेवर ताबा आहे, आणि आपल्या कुमारिकेला तसेच ठेवावे असे ज्याने आपल्या अंतःकरणात ठरवले आहे, तो बरे करतो.[३८] जो आपल्या कुमारिकेचे लग्न करून देतो तो बरे करतो; पण जो लग्न करून देत नाही तो अधिक बरे करतो.[३९] पती जिवंत आहे तोपर्यंत पत्नी बांधलेली आहे; पती मेल्यावर तिची इच्छा असेल त्याच्याबरोबर, पण केवळ प्रभूमध्ये, लग्न करायला ती मोकळी आहे.[४०] पण जर ती तशीच राहील तर माझ्या समजुतीप्रमाणे ती अधिक सुखी होईल; आणि मलाही देवाचा आत्मा आहे असे मला वाटते.

Marathi Bible 2015
Copyright © 2015 by The Bible Society of India