A A A A A

रहस्ये: [एलियन]


कलस्सियन १:१६
कारण आकाशात व पृथ्वीवर असलेले, दृश्य व अदृश्य असलेले, राजे, अधिपती, सत्ताधीश किंवा अधिकारी असलेले, जे काही आहे ते सर्व त्याच्यामध्ये निर्माण झाले; सर्वकाही त्याच्या द्वारे व त्याच्यासाठी निर्माण झाले आहे;

अनुवाद ४:१९
अथवा आकाशाकडे नजर लावून सूर्य, चंद्र, तारे अर्थात आकाशातील तारांगण पाहून बहकून जाऊन त्यांना दंडवत घालू नये व त्यांची पूजा करू नये; हे तुमचा देव परमेश्वर ह्याने आकाशाखालील सर्व लोकांना देऊन ठेवले आहेत.

अनुवाद १७:३
म्हणजे माझ्या आज्ञांचे उल्लंघन करून अन्य देवांची अथवा सूर्य, चंद्र किंवा आकाशातील तारांगण ह्यांची सेवा व पूजा करू लागले,

इफिसियन्स २:१९
तर ह्यावरून तुम्ही आतापासून परके व उपरे नाहीत; पण पवित्र जनांच्या बरोबरीचे नागरिक व देवाच्या घरचे आहात;

इफिसियन्स ६:१२
कारण आपले झगडणे रक्तमांसाबरोबर नव्हे, तर सत्तांबरोबर, अधिकार्‍यांबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतींबरोबर, आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर आहे.

निर्गम १२:४९
स्वदेशीय व तुमच्यामध्ये राहणारा उपरा ह्या दोघांना एकच नियम असावा.”

निर्गम २२:२१
उपर्‍याला छळू नकोस किंवा त्याच्यावर जुलूम करू नकोस, कारण मिसर देशात तुम्हीही उपरे होता.

निर्गम २३:९
उपर्‍यावर जुलूम करू नकोस, कारण त्याच्या मनोभावनेची तुम्हांला जाणीव आहे; कारण मिसर देशात तुम्हीही उपरे होता. सातवे वर्ष आणि शब्बाथ

यहेज्केल १:४-७
[४] मी पाहिले तो उत्तरेकडून तुफानाचा वारा सुटला, तेव्हा एक विशाल मेघ येत असून त्यामध्ये लपेटलेला एक अग्निगोल होता; त्याभोवती प्रभा फाकली असून अग्नीच्या मध्यभागातून तृणमण्याच्यासारखे तेज झळकत होते.[५] त्याच्या मध्यभागी चार जिवंत प्राण्यांच्या आकृतींसारखे काही बाहेर पडले; दिसण्यात ते मनुष्याकृती होते.[६] त्या प्रत्येकाला चार मुखे होती, व प्रत्येकाला चार पंख होते.[७] त्यांचे पाय ताठ उभे होते आणि त्यांच्या पायांचे तळवे वासराच्या पायांच्या तळव्यांसारखे असून उजळ पितळेसारखे झळकत होते.

उत्पत्ति १:२६
मग देव बोलला, “आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश असा मनुष्य आपण करू; समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, ग्रामपशू, अवघी पृथ्वी आणि पृथ्वीवर रांगणारे सर्व प्राणी ह्यांवर ते सत्ता चालवतील.”

उत्पत्ति २:१
ह्याप्रमाणे आकाश व पृथ्वी आणि तेथील सर्वकाही सिद्ध झाले.

इब्री ११:१३
हे सर्व जण विश्वासात टिकून मेले; त्यांना वचनानुसार फलप्राप्ती झाली नव्हती, तर त्यांनी ती दुरून पाहिली व तिला वंदन केले आणि आपण ‘पृथ्वीवर परके व प्रवासी’ आहोत असे पत्करले.

इब्री १३:२
अतिथिप्रेमाचा विसर पडू देऊ नका; कारण तेणेकरून कित्येकांनी देवदूतांचे आतिथ्य नकळत केले आहे.

यशया १३:५
ते दूर देशातून, दिगंतापासून येत आहेत; परमेश्वर व त्याची क्रोधशस्त्रे देशाचा विध्वंस करण्यास येत आहेत.

यशया ४५:१२
मीच पृथ्वी केली व तिच्यावर माणसे उत्पन्न केली, मी म्हणजे माझ्या हातांनी आकाश पसरले; मी आकाशसेनेस आज्ञा दिली.

यशया 60:8
जे मेघाप्रमाणे धावत आहेत, कबुतरे आपल्या घरकुंड्यांकडे उडून जातात तसे जे उडत आहेत ते कोण?

लेवीय 24:22
तुम्ही परदेशीय असा किंवा स्वदेशीय असा, तुम्हा सर्वांना एकच नियम असावा, कारण मी परमेश्वर तुमचा देव आहे.”

नहेम्या 9:6
तूच एक परमेश्वर आहेस; आकाश व अत्युच्च आकाश व त्यांतील सर्व नक्षत्रगण, पृथ्वी व तिच्यावर वसणारे सर्व, जलाशय त्यांत असलेले सर्वकाही ह्यांचा तू उत्पन्नकर्ता व पालनकर्ता आहेस; स्वर्गातील सेना तुला नमन करते.

स्तोत्र 97:6
आकाशाने त्याची नीती प्रकट केली; सर्व लोकांनी त्याचा गौरव पाहिला.

१ पीटर 2:11
प्रियजनहो, जे तुम्ही ‘प्रवासी व परदेशवासी’ आहात त्या तुम्हांला मी विनंती करतो की, जिवात्म्याबरोबर लढणार्‍या दैहिक वासनांपासून दूर राहा.

कायदे 19:35
मग नगराचा शिरस्तेदार लोकांना शांत करून म्हणाला, “अहो इफिसकरांनो, महान अर्तमीचे देऊळ व आकाशातून पडलेल्या मूर्ती ह्यांचे इफिस नगर हे संरक्षक आहे, हे ज्याला ठाऊक नाही असा कोण माणूस आहे?

प्रकटीकरण 12:12
म्हणून ‘स्वर्गांनो’ व त्यांत राहणार्‍यांनो, ‘उल्लास करा!’ पृथ्वी व समुद्र ह्यांत राहणार्‍यांवर अनर्थ ओढवला आहे, कारण सैतान आपला काळ थोडा आहे हे ओळखून अतिशय संतप्त होऊन खाली तुमच्याकडे आला आहे.”

प्रकटीकरण 13:1
नंतर मी एक ‘श्वापद समुद्रातून वर येताना’ पाहिले; त्याला ‘दहा शिंगे’ व सात डोकी असून त्याच्या शिंगांवर दहा मुकुट आणि त्याच्या डोक्यांवर देवनिंदात्मक नावे होती.

आमोस 9:2-3
[2] ते अधोलोक फोडून आत उतरले, तरी माझा हात त्यांना तेथून ओढून काढील; ते वर स्वर्गात चढले, तरी तेथून मी त्यांना खाली ओढून आणीन.[3] ते कर्मेलाच्या माथ्यावर लपून राहिले, तरी मी त्यांचा सुगावा लावीन व तेथून त्यांना ओढून आणीन; ते समुद्राच्या तळी माझ्या दृष्टिआड लपून राहिले, तरी मी तेथे सर्पाला आज्ञा करीन म्हणजे तो त्यांना डसेल.

लेवीय १९:३३-३४
[३३] कोणी परदेशीय तुमच्या देशात तुमच्याबरोबर राहत असला तर त्याला उपद्रव देऊ नका.[३४] तुमच्याबरोबर राहणार्‍या परदेशीय मनुष्याला तुम्ही स्वदेशीय मनुष्यासारखेच लेखा; आणि त्याच्यावर स्वत:सारखी प्रीती करा; कारण तुम्हीही मिसर देशात परदेशीय होता; मी परमेश्वर तुमचा देव आहे.

प्रकटीकरण 9:7-11
[7] त्या टोळांचे ‘स्वरूप लढाईसाठी’ सज्ज केलेल्या ‘घोड्यांसारखे’ होते; त्यांच्या डोक्यावर सोन्याच्या मुकुटासारखे काहीतरी दिसत होते. त्यांचे तोंडवळे माणसांसारखे होते.[8] त्यांचे केस स्त्रियांच्या केसांसारखे आणि ‘त्यांचे दात सिंहाच्या दातांसारखे’ होते.[9] त्यांना उरस्त्राणे होती ती लोखंडी उरस्त्राणांसारखी दिसत होती; आणि त्यांच्या पंखांचा आवाज ‘लढाईत धावणार्‍या’ अनेक घोड्यांच्या ‘रथांच्या आवाजासारखा’ होता;[10] त्यांना विंचवांसारखी शेपटे व नांग्या आहेत आणि माणसांना पाच महिने उपद्रव करण्याची त्यांची शक्ती त्यांच्या शेपटांत आहे.[11] अथांग डोहाचा दूत हा त्यांच्यावर राजा आहे; इब्री भाषेतील त्यांचे नाव अबद्दोन, आणि हेल्लेणी भाषेतील त्याचे नाव अपल्लूओन आहे.

उत्पत्ति ६:१-२२
[१] नंतर भूतलावर मनुष्यांची वाढ होऊ लागली आणि त्यांना कन्या झाल्या;[२] तेव्हा मानवकन्या सुंदर आहेत असे देवपुत्रांनी पाहिले; आणि त्यांच्यातल्या ज्या त्यांना आवडल्या त्या त्यांनी बायका केल्या.[३] तेव्हा परमेश्वर म्हणाला, “मनुष्य भ्रांत झाल्यामुळे माझ्या आत्म्याची त्याच्या ठायी सर्वकाळ सत्ता राहणार नाही; तो देहधारी आहे; तथापि मी त्याला एकशे वीस वर्षांचा काळ देईन.”[४] त्या काळी भूतलावर महाकाय1 होते; पुढे देवपुत्र मानवकन्यांपाशी गेले तेव्हा त्यांना पुत्र झाले. ते प्राचीन काळचे महावीर असून नामांकित पुरुष होऊन गेले.[५] पृथ्वीवर मानवांची दुष्टाई फार आहे, त्यांच्या मनात येणार्‍या विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट असतात असे परमेश्वराने पाहिले;[६] म्हणून मानव पृथ्वीवर उत्पन्न केल्याचा परमेश्वराला अनुताप झाला आणि त्याच्या चित्ताला खेद झाला.[७] तेव्हा परमेश्वर म्हणाला, “मी उत्पन्न केलेल्या मानवाला भूतलावरून नष्ट करीन; मानव, पशू, रांगणारे प्राणी, आकाशातील पक्षी हे सारे नाहीसे करीन; कारण त्यांना उत्पन्न केल्याचा मला अनुताप झाला आहे.”[८] परंतु नोहावर परमेश्वराची कृपादृष्टी होती.[९] ही नोहाची वंशावळी. नोहा हा त्याच्या पिढीतील लोकांमध्ये नीतिमान व सात्त्विक मनुष्य होता; नोहा देवाबरोबर चालला.[१०] नोहाला शेम, हाम व याफेथ असे तीन मुलगे झाले.[११] त्या काळी देवाच्या दृष्टीने पृथ्वी भ्रष्ट झाली होती; ती जाचजुलमांनी भरली होती.[१२] देवाने पृथ्वीकडे अवलोकन केले तर पाहा, ती भ्रष्ट होती; कारण पृथ्वीवरील सर्व प्राणिमात्रांनी आपली चालचलणूक बिघडवली होती.[१३] मग देव नोहाला म्हणाला, “सर्व प्राण्यांचा अंत करण्याचे माझ्या मनात आले आहे, कारण त्यांच्यामुळे पृथ्वीवर जाचजुलूम माजला आहे. पाहा, मी पृथ्वीसह त्यांचा नाश करीन.[१४] तू आपल्यासाठी गोफेर लाकडाचे तारू कर; त्या तारवात कोठड्या कर आणि त्याला आतून व बाहेरून डांबर लाव.[१५] तारू करायचे ते असे: त्याची लांबी तीनशे हात, रुंदी पन्नास हात व उंची तीस हात असावी.[१६] तारवाला उजेडासाठी खिडकी कर; तिचा माथा वरपासून एक हात असेल अशी कर; तारवाच्या एका बाजूला दार ठेव; त्याला खालचा; दुसरा व तिसरा असे मजले कर.[१७] पाहा, ज्यांच्या ठायी प्राण आहे असे सर्व देहधारी आकाशाखालून नाहीसे करावे म्हणून मी पृथ्वीवर प्रलयाचे पाणी आणतो; पृथ्वीवर जे काही आहे ते नष्ट होईल;[१८] तरी तुझ्याशी मी आपला करार स्थापित करतो, तू आपले मुलगे, आपली स्त्री व आपल्या सुना ह्यांना घेऊन तारवात जा.[१९] सर्व प्राण्यांच्या प्रत्येक जातीतून नर व मादी अशी दोन-दोन जिवंत राखण्यासाठी आपल्याबरोबर तारवात ने.[२०] पक्ष्यांच्या प्रत्येक जातीतून, पशूंच्या प्रत्येक जातीतून आणि भूमीवर रांगणार्‍या प्राण्यांच्या प्रत्येक जातीतून दोन-दोन प्राणरक्षणार्थ तुझ्याकडे येतील.[२१] खाण्यात येते ते सर्व प्रकारचे अन्न आपल्याजवळ आणून त्याचा साठा कर; ते तुला व त्यांना खायला मिळेल.”[२२] नोहाने तसे केले; देवाने त्याला जे काही सांगितले ते त्याने केले.

यहेज्केल 1:1-28
[1] मी खबार नदीच्या तीरी पकडून आणलेल्या लोकांत राहत होतो, तेव्हा तिसाव्या वर्षाच्या चौथ्या मासी पंचमीस असे झाले की आकाश दुभागून मला दिव्य दृष्टान्त दिसले.[2] हे यहोयाखीन राजाच्या बंदिवासाचे पाचवे वर्ष होते; त्या महिन्याच्या पाचव्या दिवशी[3] खास्द्यांच्या देशात खबार नदीच्या तीरी बूजीचा पुत्र यहेज्केल याजक ह्याला परमेश्वराचे वचन स्पष्टपणे प्राप्त झाले; तेथे परमेश्वराचा वरदहस्त त्याच्यावर आला.[4] मी पाहिले तो उत्तरेकडून तुफानाचा वारा सुटला, तेव्हा एक विशाल मेघ येत असून त्यामध्ये लपेटलेला एक अग्निगोल होता; त्याभोवती प्रभा फाकली असून अग्नीच्या मध्यभागातून तृणमण्याच्यासारखे तेज झळकत होते.[5] त्याच्या मध्यभागी चार जिवंत प्राण्यांच्या आकृतींसारखे काही बाहेर पडले; दिसण्यात ते मनुष्याकृती होते.[6] त्या प्रत्येकाला चार मुखे होती, व प्रत्येकाला चार पंख होते.[7] त्यांचे पाय ताठ उभे होते आणि त्यांच्या पायांचे तळवे वासराच्या पायांच्या तळव्यांसारखे असून उजळ पितळेसारखे झळकत होते.[8] त्यांच्या चोहोबाजूंना पंखांच्या खाली त्यांना माणसांचे हात होते; त्या चौघांना मुखे व पंख होते.[9] त्यांचे पंख एकाचे दुसर्‍याशी लागलेले होते; ते चालताना वळत नसत, तर ते प्रत्येक पाहिजे त्या आपल्या मुखाच्या दिशेने नीट समोर जात.[10] त्या चौघांच्या मुखांपैकी एक मुख मनुष्याचे होते, त्या चौघांचे उजव्या बाजूचे एक मुख सिंहाचे होते; त्या चौघांचे डाव्या बाजूचे एक मुख बैलाचे होते; आणि त्या चौघांचे एक मुख गरुडाचेही होते, अशी त्यांची मुखे होती.[11] वरच्या अंगी त्यांची मुखे व त्यांचे पंख विभक्त होते. प्रत्येकाचे दोन पंख जवळील दुसर्‍याच्या एकेका पंखाला लागले होते; आणि प्रत्येकाच्या दोन-दोन पंखांनी त्यांचे शरीर आच्छादले होते.[12] ते प्रत्येक पाहिजे त्या आपल्या मुखाच्या दिशेने नीट समोर जात; आत्मा नेई तिकडे जात; चालताना वळत नसत.[13] त्या प्राण्यांचे रूप म्हटले तर अग्नीच्या इंगळासारखे, मशालीसारखे दिसत होते. अग्नी त्या प्राण्यांमधून खेळत होता; तो धगधगीत असून त्यातून विद्युल्लता निघत होती.[14] ते प्राणी विजेसारखे नागमोडीच्या गतीने इकडून तिकडे धावत.[15] मी त्या प्राण्यांकडे पाहिले तेव्हा त्यांच्याजवळ त्यांच्या चारही मुखांच्या बाजूस भूमीवर एकेक चाक होते.[16] ती चाके व त्यांचा घाट ही वैडूर्य मण्यांसारखी दिसत होती; त्या चोहोंचा आकार एकच होता; त्यांचा आकार व घाट जणू काय चाकांत चाक असा होता.[17] ते चालत तेव्हा ते चार दिशांपैकी पाहिजे त्या दिशेस नीट समोर चालत; चालताना वळत नसत.[18] चाकाच्या धावा पाहिल्या तर त्या फार उंच व भयानक होत्या; त्या चोहोंच्या धावांसभोवती सर्वत्र डोळे होते.[19] ते प्राणी चालत तेव्हा चाकेही त्यांच्याबरोबर चालत आणि ते जमीन सोडून वर चढत तेव्हा चाकेही चढत.[20] जिकडे आत्मा नेई तिकडे त्याच्या गतीच्या रोखाने ते जात; त्यांच्याबरोबर चाकेही उचलत, कारण त्या प्राण्यांचा आत्मा चाकांत होता.[21] ते चालले म्हणजे ही चालत; ते थांबले म्हणजे हीही थांबत; ते जमीन सोडून वर चढले म्हणजे त्यांच्याबरोबर चाकेही चढत; कारण त्या प्राण्यांचा आत्मा चाकांत होता.[22] त्या प्राण्यांच्या माथ्यावर चांदव्यासारखे (अंतराळा-सारखे) काही होते, ते दिपवणार्‍या व भयानक स्फटिकासारखे दिसले; ते त्यांच्या डोक्यावरून ताणलेले होते.[23] त्या चांदव्याखाली त्यांचे पंख नीट पसरून एकमेकांना लागलेले होते; ह्या बाजूला आणि त्या बाजूला शरीर आच्छादणारे असे प्रत्येकाला दोन-दोन पंख होते.[24] ते चालत असता मला त्यांच्या पंखांचा आवाज ऐकू आला; तो महाजलाशयांच्या आवाजासारखा, सर्वसमर्थाच्या वाणीसारखा होता; लष्कराच्या गजबजीप्रमाणे तो मोठा होता; ते उभे राहत तेव्हा आपले पंख खाली सोडत.[25] त्यांच्या डोक्यांवर असलेल्या चांदव्यातून वाणी होत असे; ते उभे राहत तेव्हा आपले पंख खाली सोडत.[26] त्यांच्या डोक्यांवर असलेल्या चांदव्यावर नीलमण्याच्या सिंहासनासारखे काही दिसत होते आणि त्या सिंहासनावर पुरुष असल्याचा भास होत होता.[27] त्याच्या ठायी सर्वत्र तृणमण्याच्या तेजासारखा अग्नीचा भास मला झाला; त्याच्या कंबरेपासून वर व त्याच्या कंबरेपासून खाली अग्नीचा भास मला झाला व त्यांच्याभोवती प्रभा चमकत होती.[28] पावसाच्या दिवशी मेघांत दिसणार्‍या धनुष्याप्रमाणे त्यांच्याभोवती प्रभा फाकलेली मला दिसली; परमेश्वराच्या तेजाचे हे दर्शन होते. मी ते पाहून उपडा पडलो व कोणा बोलणार्‍याची वाणी माझ्या कानी आली.

Marathi Bible 2015
Copyright © 2015 by The Bible Society of India