A A A A A
Facebook Instagram Twitter
मराठी बायबल (BSI) 2018

जेम्स ५अहो धनवानांनो, माझे ऐका! जे क्लेश तुम्हांला होणार आहेत, त्याविषयी रडून आकांत करा.
तुमचे धन भ्रष्ट आहे व तुमच्या वस्त्रांना कसर लागली आहे.
तुमचे सोने व तुमचे रुपे ह्यावर गंज चढला आहे. त्यांचा तो गंज तुमच्याविरुद्ध साक्ष होईल आणि तो अग्नीप्रमाणे तुमचा देह खाईल. ह्या शेवटच्या दिवसांत तुम्ही धन साठविले आहे.
पाहा, ज्या कामगारांनी तुमच्या शेतांची कापणी केली त्यांची तुम्ही न दिलेली मजुरी ओरडत आहे आणि कापणी करणाऱ्यांचा आक्रोश सर्वसमर्थ प्रभूच्या कानी गेला आहे.
तुम्ही पृथ्वीवर चैनबाजी व विलास केला, कत्तलीच्या दिवसासाठी तुम्ही स्वतःला धष्टपुष्ट केले आहे.
निर्दोष लोकांना तुम्ही दोषी ठरविले, त्यांचा घात केला. ते तुम्हांला विरोध करत नाहीत.
अहो बंधूंनो, प्रभूच्या आगमनापर्यंत धीर धरा. पाहा, शेतकरी भूमीच्या मौल्यवान पिकाची वाट पाहत असता, त्याला पहिला व शेवटचा पाऊस मिळेपर्यंत त्याविषयी तो धीर धरतो.
तुम्हीही धीर धरा, आपली अंतःकरणे स्थिर करा, कारण प्रभूच्या आगमनाची वेळ जवळ आली आहे.
बंधूंनो, तुम्ही दोषी ठरू नये म्हणून एकमेकांविषयी कुरकुर करू नका. पाहा, न्यायाधीश दाराजवळ उभा आहे.
१०
बंधूंनो, जे संदेष्टे प्रभूच्या नावाने बोलले, त्यांचे दु:खसहन व त्यांचा धीर ह्याविषयीचा आदर्श ठेवा.
११
पाहा, ज्यांनी सहन केले त्यांना आपण धन्य म्हणतो. तुम्ही ईयोबच्या धीराविषयी ऐकले आहे आणि त्याच्याविषयीचा प्रभूचा जो हेतू होता, तो तुम्ही पाहिला आहे. ह्यावरून प्रभू फार कनवाळू व दयाळू आहे, हे तुम्हांला दिसून आले.
१२
माझ्या बंधूंनो, सर्वात मुख्य म्हणजे शपथ वाहू नका. स्वर्गाची, पृथ्वीची किंवा दुसरी कशाचीही शपथ वाहू नका. तुम्ही दोषी ठरू नये म्हणून तुम्हांला होय म्हणावयाचे तर होय म्हणा, नाही म्हणावयाचे तर नाही म्हणा.
१३
तुमच्यापैकी कोणी दुःख भोगत आहे काय? त्याने प्रार्थना करावी. कोणी आनंदित आहे काय? त्याने स्तोत्रे गावीत.
१४
तुमच्यापैकी कोणी आजारी आहे काय? त्याने चर्चंच्या वडील जनांना बोलवावे आणि त्यांनी प्रभूच्या नावाने त्याला ऑलिव्ह तेल लावावे व त्याच्यावर ओणवे होऊन प्रार्थना करावी.
१५
श्रद्धेने केलेली प्रार्थना आजाऱ्याला वाचवील आणि प्रभू त्याला बरे करील आणि त्याने केलेल्या पापांबद्दल त्याला क्षमा केली जाईल.
१६
तर मग तुम्ही आरोग्यसंपन्न व्हावे म्हणून आपली पापे एकमेकांजवळ कबूल करून एकमेकांसाठी प्रार्थना करा. नीतिमानांची प्रार्थना कार्य करण्यात फार प्रबळ असते.
१७
एलीया आपल्यासारखा माणूस होता. त्याने पाऊस पडू नये अशी जिवेभावे प्रार्थना केली आणि साडेतीन वर्षे पृथ्वीवर पाऊस पडला नाही.
१८
पुन्हा त्याने प्रार्थना केली, तेव्हा पाऊस पडला आणि भूमीने आपले फळ उपजविले.
१९
माझ्या बंधूंनो, तुमच्यामधील कोणी सत्यापासून बहकला आणि त्याला कोणी परत फिरविले,
२०
तर पापी माणसाला त्याच्या चुकलेल्या मार्गावरून जो परत फिरवितो तो त्याचा जीव मरणापासून वाचवील व अनेक पापांबद्दल क्षमा मिळवील, हे लक्षात ठेवा.जेम्स ५:1
जेम्स ५:2
जेम्स ५:3
जेम्स ५:4
जेम्स ५:5
जेम्स ५:6
जेम्स ५:7
जेम्स ५:8
जेम्स ५:9
जेम्स ५:10
जेम्स ५:11
जेम्स ५:12
जेम्स ५:13
जेम्स ५:14
जेम्स ५:15
जेम्स ५:16
जेम्स ५:17
जेम्स ५:18
जेम्स ५:19
जेम्स ५:20


जेम्स 1 / जेम्स 1
जेम्स 2 / जेम्स 2
जेम्स 3 / जेम्स 3
जेम्स 4 / जेम्स 4
जेम्स 5 / जेम्स 5