बायबल एकाच वर्षात


नोव्हेंबर २२


यिर्मया ४९:१-३९
१. हा संदेश अम्मोनी लोकांसाठी आहे. परमेश्वर म्हणतो, “अम्मोनी लोकांनो, इस्राएली लोकांना मुले नाहीत असे तुम्हाला वाटते का? आईवडील गेल्यावर तेथील जमिनीला कोणी वारस नाही असे तुम्ही समजता का? म्हणूनच कदाचित् मिलकोमने गादची भूमी घेतली का?”
२. परमेश्वर म्हणतो, “अम्मोनीच्या राब्बातून युद्धाचा खणखणाट ऐकण्याची वेळ येईल. राब्बाचा नाश होईल. ते पडझड झालेल्या इमारतींनी झाकलेली ओसाड टेकडी होईल. त्याच्या भोवतीची गावे जाळली जातील. ज्या लोकांनी, इस्राएलच्या लोकांना इस्राएलची भूमी बळजबरीने सोडायला लावली, त्यांच्याकडून इस्राएलचे लोक आपल्या भूमीचा ताबा घेतील. पण भविष्यात, इस्राएल त्यांना बळजबरीने हाकलून लावेल.” परमेश्वराने हे सांगितले.
३. “हेशबोनच्या लोकांनो, रडा का? कारण आयचा नाश झाला आहे. अम्मोनच्या राब्बातील स्त्रियांनो, शोक करा. शोकप्रदर्शक कपडे घालून रडा! सुरक्षेसाठी शहराकडे पळा! का? कारण शत्रू येत आहे. ते मिलकोम दैवताला, त्याच्या पुजाऱ्याला व इतर अधिकाऱ्यांना नेतील.
४. तुम्ही तुमच्या सामर्थ्याबद्दल बढाया मारता. पण तुम्ही दुर्बल होत आहात. तुमचा पैसा तुम्हाला वाचवील असा तुम्हाला विश्वास वाटतो तुमच्यावर हल्ला करण्याचा कोणी विचारही करणार नाही असे तुम्ही समजता.”
५. पण सर्वशक्तिमान परमेश्वर असे म्हणतो: “मी सर्व बाजूंनी तुमच्यावर संकटे आणीन. तुम्ही सर्व पळून जाल आणि कोणीही तुम्हाला एकत्र आणू शकणार नाही.”
६. “अम्मोनी लोकांना कैदी करुन नेले जाईल. पण एक वेळ अशी येईल की मी त्यांना परत आणीन.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.
७. हा संदेश अदोमसाठी आहे सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो: “तेमानमध्ये जरासुद्धा शहाणपण उरले नाही का? अदोमचे सुज्ञ लोक चांगला सल्ला देऊ शकत नाहीत का? त्यांनी त्यांचे शहाणपण गमावले का?
८. ददानच्या लोकांनो, पळा! लपा! का? कारण मी एसावाला त्याने केलेल्या दुष्कृत्याबद्दल शिक्षा करीन.
९. “मजूर द्राक्षमळ्यातून द्राक्षे तोडतात पण ते काही द्राक्षे झाडावरच ठेवतात. चोरसुद्धा सर्व नेत नाही.
१०. पण एसावातील सर्व काही मी काढून घेईन, मी त्याच्या सर्व लपायच्या जागा शोधून काढीन. तो माझ्यापासून लपून राहू शकणार नाही. त्याची मुले, नातेवाईक, शेजारी सर्व मरतील.
११. त्याच्या मुलांची काळजी घ्यायला कोणीही शिल्लक राहणार नाही. त्याच्या बायका निराधार होतील.” पण मी (देव) तुमच्या अनाथ मुलांच्या जीवाचे रक्षण करीन. तुमच्या विधवा माझ्यावर विश्वास ठेऊ शकतात.”
१२. परमेश्वर म्हणतो: “काही लोक शिक्षेला पात्र नाहीत. पण त्यांना सोसावे लागते. पण अदोम, तू शिक्षेला पात्र आहेस. म्हणून तुला खरोखरीच शिक्षा होईल. तुझ्या शिक्षेतून तुझी सुटका होणार नाही. तुला शिक्षा होईलच.”
१३. परमेश्वर म्हणतो, “माझ्या अधिकारात मी वचन देतो की बसऱ्याचा नाश होईल. ते शहर पडझड झालेल्या दगडांची रास होईल. दुसऱ्या शहरांना शाप देताना लोक बसऱ्याचे नाव उच्चारतील. लोक त्याचा अपमान करतील आणि त्याभोवतालची गावेसुद्धा कायमची नाश पावतील.”
१४. मी परमेश्वराकडून आलेला संदेश ऐकला परमेश्वराने राष्ट्रांकडे दूत पाठविला. तो असा “तुमची सैन्ये गोळा करा. लढायला सज्ज व्हा. अदोमकडे कूच करा.
१५. “अदोम, मी तुला राष्ट्रांमध्ये क्षुद्र बनवीन. प्रत्येकजण तुझा तिरस्कार करील.
१६. अदोम, तू दुसऱ्या राष्ट्रांना घाबरविलेस! म्हणून तू स्वत:ला श्रेष्ठ समजलास! पण तू मूर्ख बनलास! तुझ्या गर्वाने तुला फसविले. अदोम, तू डोंगरात उंचावर राहतोस मोठ्या दगड धोंड्यांनी सुरक्षित केलेल्या जागी तू राहतोस पण जरी तू गरुडाच्या घरट्याप्रमाणे उंच घर बांधलेस तरी मी तुला पकडून खाली खेचून आणीन.” परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या.
१७. अदोमचा नाश होईल. लोकांना ते पाहून धक्का बसेल. नाश झालेली शहरे पाहून लोक चकित होऊन सुस्कारे सोडतील.
१८. सदोम, गमोरा त्याभोवतालची गावे यांच्याप्रमाणे अदोमचा नाश होईल. तेथे कोणीही राहणार नाही.” देव असे म्हणाला,
१९. “यार्देन नदीजवळच्या दाट झुडुपातून कधीतरी सिंह येईल व तो लोक शेतात जेथे मेंढ्या व गुरे ठेवतात, तेथे जाईल. मी त्या सिंहा सारखाच आहे. मी अदोमला जाईन आणि त्या लोकांना घाबरवीन. मी त्यांना पळून जायला भाग पाडीन, त्यांचा एकही तरुण मला थांबवू शकणार नाही. कोणीही माझ्यासारखा नाही. कोणीही मला आव्हान देणार नाही. त्यांचा कोणीही मेंढपाळ (नेता) माझ्या विरोधात उभा राहणार नाही.”
२०. म्हणून अदोमच्या लोकांसाठी परमेश्वराने आखलेला बेत काय आहे तो ऐका: तेमानच्या लोकांचे काय करायचे ते परमेश्वराने ठरविले आहे. ते काय ठरविले आहे तेही ऐका. शत्रू अदोमच्या कळपातून (लोकांतून) लहान लेकरांना ओढून नेईल. त्यांनी केलेल्या कृत्यांमुळे अदोमची कुरणे ओसाड बनतील.
२१. अदोमच्या पडण्याच्या आवाजाने धरणी हादरेल. त्याचा आक्रोश तांबड्या समुद्रापर्येत ऐकू जाईल.
२२. हेरलेल्या सावजावर घिरटया घालणाऱ्या गरुडाप्रमाणे परमेश्वर आहे. परमेश्वर, गरुडाप्रमाणे, आपले पंख बसऱ्यावर पसरेल. त्या वेळी अदोमचे सैनिक फार भयभीत होतील प्रसूत होणाऱ्या स्त्रीप्रमाणे शूर सैनिक भीतीने रडतील.
२३. हा संदेश दिमिष्क शहरासाठी आहे. ‘हमाथ व अर्पाद ही गावे घाबरली आहेत वाईट बातमी ऐकल्याने ती घाबरलीत. त्यांचा धीर खचला आहे. ते चिंताग्रस्त झाले आहेत आणि भयभीतही
२४. दिमीष्क दुबळे झाले आहे. लोकांना पळून जायचे आहे. लोक भीतिग्रस्त होण्याच्या बेतात आहेत. प्रसूत होणाऱ्या स्त्रीप्रमाणे लोकांना यातना व वेदना होत आहेत.
२५. “दिमिष्क एक सुखी नगरी होती. लोकांनी अजून ती ‘मौजेची नगरी’ सोडलेली नाही.
२६. म्हणून तरुण त्या नगरीतील सार्वजनिक स्थळी मरतील. त्या वेळी तिचे सर्व सैनिक मारले जातील.” सर्वशक्तिमान परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या.
२७. “मी दिमिष्काच्या तटबंदीला आग लावीन. ती बेन-हदादचे मजबूत गड पूर्णपणे बेचिराख करील.”
२८. हा संदेश केदारच्या कुळांसाठी व हासोरच्या राज्यकर्त्यांसाठी आहे. बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याने त्यांचा पराभव केला. परमेश्वर म्हणतो, “जा आणि केदारच्या कुळांवर चढाई करा. पूर्वेच्या लोकांचा नाश करा.
२९. त्यांचे तंबू व कळप नेले जातील. त्यांचे तंबू व संपत्ती घेतली जाईल त्यांचा शत्रू त्यांचे उंट नेईल. लोक त्यांना ओरडून सांगतील. ‘आमच्याभोवती काहीतरी भयंकर घडत आहे.’
३०. लवकर पळा! हासोरवासीयांनो, लपायला चांगली जागा शोधा.” हा परमेश्वराचा संदेश आहे. “नबुखद्नेस्सरने तुमच्याविरुद्ध कट केला आहे. तुमचा पराभव करण्यासाठी त्याने हुशारीने बेत रचला आहे.
३१. आपण सुरक्षित आहोत अशी भावना असलेले एक राष्ट्र आहे. त्याला अतिशय सुरक्षित वाटते त्याच्या रक्षणसाठी दरवाजे वा कुंपण नाही. त्यांच्याजवळ कोणी माणसे राहात नाहीत. परमेश्वर म्हणतो, ‘त्या राष्ट्रांवर हल्ला करा.’
३२. शत्रू त्यांचे उंट व गुरांचे मोठे कळप चोरेल. ते लोक त्यांच्या दाढीच्या कडा कापतात. मी त्यांना जगाच्या लांबच्या कोपऱ्यात पळून जायला लावीन. मी, त्यांच्यावर, सगळीकडून संकटे आणीन.” हा परमेश्वराचा संदेश आहे.
३३. “हासोरला फक्त कोल्ह्यांची वस्ती होईल. तेथे कोणीही मनुष्यप्राणी राहणार नाही. ती जागा निर्जन होईल. तेथे कायमचे ओसाड वाळवंट होईल.”
३४. यहूदाचा राजा सिद्कीया ह्याचा कारकिर्दीच्या सुरवातीच्या काळात यिर्मया या संदेष्ट्याला परमेश्वराचा संदेश मिळाला. तो एलाम या राष्ट्राबाबत होता.
३५. सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो, “मी लवकरच एलामचे धनुष्य मोडीन. धनुष्य हे त्याचे सर्वांत सामर्थ्यशाली शस्त्र आहे.
३६. मी एलामच्या विरुद्ध चार वारे सोडीन. मी त्यांना आकाशाच्या चार कोपऱ्यातून सोडीन. जगाच्या पाठीवर जेथे चारी वारे पोहोचतील अशा ठिकाणी मी त्यांना पाठवीन. एलामचे लोक कैदी म्हणून प्रत्येक राष्ट्रांतून नेले जातील.
३७. एलामचे त्याच्या शत्रूसमोर मी तुकडे तुकडे करीन. जे लोक त्याला ठार करु इच्छितात, त्यांच्यासमोर मी एलामला मोडीन. मी त्यांच्यावर भयंकर संकटे आणीन. मी कित्ती रागावलो आहे, हे त्यांना दाखवून देईल.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. “एलामचा पाठलाग करायला मी तलवार पाठवीन. मी त्या सर्वांना ठार करेपर्यंत, ती त्यांचा पाठलाग करील.
३८. नियंत्रण करणे माझ्या हातात आहे, हे मी एलामला दाखवून देईन. मी राजा व त्याचे अधिकारी यांना ठार करीन.” हा देवाचा संदेश आहे.
३९. “पण भविष्यात, मी एलामला परत आणीन आणि तिच्याबाबतीत चांगल्या गोष्टी घडतील असे करीन.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.

यिर्मया ५०:१-४६
१. बाबेल व खास्दी ह्यंच्यासाठी परमेश्वराने पुढील संदेश दिला हा संदेश देवाने यिर्मयामार्फत दिला.
२. “सर्व राष्ट्रांत घोषणा कर! झेंडा उंच उभारुन संदेश दे. माझा सगळा संदेश दे आणि सांग ‘बाबेल काबीज केला जाईल. बेल दैवताची फजिती होईल. मरदोख घाबरुन जाईल. बाबेलच्या मूर्तींची विटंबना केली जाईल. त्या भयभीत होतील.’
३. उत्तरेकडचे राष्ट्र बाबेलवर चढाई करील. ते राष्ट्र बाबेलचे ओसाड वाळवंट करील. तेथे कोणीही राहणार नाही. माणसे व प्राणी, दोघेही, तेथून पळ काढतील”
४. परमेश्वर म्हणतो, “त्या वेळी इस्राएलचे व यहूदाचे लोक एकत्र येतील. ते एकत्र येऊन रडतील, आणि एकत्रितपणेच त्यांच्या परमेश्वर देवाचा शोध घेतील.
५. ते सियोनची वाट विचारतील, व ते त्या दिशेने चालायला सुरवात करतील. लोक म्हणतील, ‘चला, आपण स्वत: परमेश्वराला जाऊन मिळू या, अखंड राहणारा एक करार करु या. आपण कधीही विसरणार नाही असा करार करु या.’
६. “माझे लोक चुकलेल्या मेंढराप्रमाणे आहेत. त्यांच्या मेंढपाळांनी (नेत्यांनी) त्यांना चुकीच्या मार्गाने नेले. त्यांना डोंगर टेकड्यांतून भटकायला लावले. ते त्यांच्या विश्रांतीची जागा विसरले.
७. ज्यांना माझे लोक सापडले, त्यांनी त्यांना दुखवले, आणि ते शत्रू म्हणाले, ‘आम्ही काहीही चूक केली नाही.’ त्या लोकांनी परमेश्वराविरुद्ध पाप केले. परमेश्वरच खरा त्यांचे विश्रांतिस्थान होता. त्यांच्या वडिलांनी परमेश्वर देवावरच विश्वास ठेवला.
८. “बाबेलपासून दूर पळा खास्द्यांची भूमी सोडा कळपाच्या पुढे चालणाऱ्या एडक्याप्रमाणे व्हा.
९. मी उत्तरेकडून खूप राष्ट्रांना एकत्र आणीन. ते बाबेलविरुद्ध लढायला सज्ज होतील. उत्तरेकडचे लोक बाबेल काबीज करतील. ते बाबेलवर बाणांचा वर्षाव करतील. ते बाण, युद्धावरुन रिकाम्या हाताने कधीच न परतणाऱ्या, सैनिकांप्रमाणे असतील.
१०. शत्रू खास्द्यांची सर्व संपत्ती घेतील. सैनिक त्यांना पाहिजे ते लुटून नेतील.” परमेश्वरानेच ह्या गोष्टी सांगितल्या.
११. “बाबेल, तू आनंदी व उल्हसित आहेस तू माझी भूमी घेतलीस. धान्यात शिरलेल्या गायीप्रमाणे तू नाचतेस. तू आनंदाने घोड्याप्रमाणे खिंकाळतेस.
१२. “आता तुझी आई खजील होईल. तुला जन्म देणारी ओशाळवाणी होईल. बाबेल सर्व राष्ट्रांत क्षुद्र ठरेल. ती म्हणजे ओसाड, निर्जन वाळवंट होईल.
१३. परमेश्वर आपला क्रोध प्रकट करील, म्हणून तेथे कोणीही राहणार नाही. बाबेल संपूर्ण निर्जन होईल. “बाबेल जवळून जाणारा प्रत्येकजण भयभीत होईल. बाबेलचा असा वाईट रीतीने नाश झालेला पाहून ते हळहळतील.
१४. “बाबेलविरुद्ध लढण्यास सज्ज व्हा. धनुर्धाऱ्यांनो बाबेलवर बाणांचा वर्षाव करा. त्यात कमतरता करु नका. बाबेलने परमेश्वराविरुद्ध पाप केले आहे.
१५. बाबेलला वेढा घातलेल्या सैनिकांनो जयघोष करा. बाबेलने शरणागती पत्करली आहे. तिची तटबंदी व बुरुज पाडले आहेत. परमेश्वर त्यांना योग्य तीच शिक्षा करीत आहे. तिच्या लायकीप्रमाणे, तुम्ही राष्ट्रांनी तिला शिक्षा द्यावी. तिने जसे इतर राष्ट्रांशी वर्तन, केले, तसेच तिच्याशी करा.
१६. बाबेलमधील लोकांना धान्य पेरु देऊ नका. त्यांना पीक काढू देऊ नका. बाबेलच्या सैनिकांनी खूप कैद्यांना त्यांच्या शहरात आणले. पण आता शत्रू सैनिक आले आहेत, त्यामुळे कैदी आपापल्या घरी परत जात आहेत. ते आपल्या देशांकडे धाव घेत आहेत.
१७. “सर्व देशभर पसरलेल्या मेंढ्यांच्या कळपाप्रमाणे इस्राएल आहे. सिंहाने पाठलाग करुन दूर पळवून लावलेल्या मेंढराप्रमाणे इस्राएल आहे. त्यांच्यावर प्रथम हल्ला करणारा सिंह म्हणजे अश्शूरचा राजा आणि त्याची हाडे मोडणारा अखेरच सिंह म्हणजे बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर होय.”
१८. म्हणून सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो, “मी लवकरच बाबेलच्या राजाला व त्याच्या देशाला शिक्षा करीन. अश्शुरच्या राजाला केली तशीच बाबेलच्या राजाला मी शिक्षा करीन.
१९. “मी इस्राएलला त्याच्या भूमीत परत आणीन. कर्मेलच्या डोंगरावर व बाशानच्या भूमीत वाढलेले धान्य तो खाईल व तृप्त होईल. एफ्राईम व गिलाद येथील टेकड्यांवर तो चरेल.”
२०. परमेश्वर म्हणतो, “त्या वेळी, लोक, इस्राएलचे अपराध शोधण्याचे कसून प्रयत्न करतील. पण अपराध असणारच नाही. लोक यहूदाची पापे शोधण्याचे प्रयत्न करतील. पण त्यांना एकही पाप सापडणार नाही. का? कारण मी इस्राएलमधील व यहूदातील काही वाचलेल्या लोकांचे रक्षण करीन आणि त्यांनी पाप केले असले तरी त्यांना क्षमा करीन.”
२१. परमेश्वर म्हणतो, “मराथाईमवर हल्ला करा. पकोडच्या लोकांवर चढाई करा. त्यांच्यावर हल्ला करा. त्यांना ठार करा. त्यांचा संपूर्ण नाश करा. माझ्या आज्ञेप्रमाणे करा.
२२. “युध्दाचा खणखणाट सर्व देशातू ऐकू जाऊ शकेल. तो मोठ्या नाशाचा आवाज असेल.
२३. बाबेलला ‘सर्व जगाचा हातोडा’ असे म्हटले गेले. पण आता ‘हातोड्याचे तुकडे तुकडे झाले आहेत इतर राष्ट्रापेक्षा बाबेलचा सर्वाधिक नाश झाला आहे.
२४. बाबेल, मी तुझ्यासाठी सापळा रचला, आणि तुला समजण्याआधीच तू पकडला गेलास. तू परमेश्वराविरुद्ध लढलास, म्हणून तू सापडलास व पकडला गेलास.
२५. परमेश्वराने आपले कोठार उघडले आहे. त्यांच्या क्रोधाची हत्यारे परमेश्वराने बाहेर आणली आहेत. खास्द्यांच्या देशात सर्वशक्तिमान परमेश्वर देवाला काम करायचे असल्याने त्याने ती हत्यारे बाहेर काढली आहेत.
२६. दूरवरुन बाबेलवर चालून या. तिची धान्याची कोठारे फोडा. बाबेलचा संपूर्ण नाश करा. कोणालाही जिवंत सोडू नका. धान्याच्या राशीप्रमाणे प्रेतांच्या राशी घाला.
२७. बाबेलमधल्या सर्व तरुण बैलांना (पुरुषांना) ठार करा. त्यांची कत्तल होऊ द्या. त्यांच्या पराभवाची वेळ आली आहे. त्यांचे फार वाईट होईल. ही त्यांच्या शिक्षेची वेळ आहे.
२८. लोक बाबेलमधून बाहेर धावत आहेत. ते त्या देशातून सुटका करुन घेत आहेत. ते सियोनला येत आहेत. परमेश्वराच्या कृत्याबद्दल ते प्रत्येकाला सांगत आहेत. बाबेलला योग्य अशी शिक्षा परमेश्वर करीत असल्याबद्दल ते सांगत आहेत. बाबेलने परमेश्वराचे मंदिर उद्ध्वस्त केले म्हणून आता परमेश्वर बाबेलचा नाश करीत आहे.
२९. “धनुर्धाऱ्यांना बोलवा. त्यांना बाबेलवर हल्ला करायला सांगा. त्यांना शहराला वेढा घालायला सांगा. कोणालाही पळू देऊ नका. तिने केलेल्या दुष्कृत्यांची परतफेड करा. तिने इतर राष्ट्रांशी जसे वर्तन केले, तसेच तिच्याशी करा. बाबेलने परमेश्वराला मान दिला नाही. इस्राएलच्या पवित्र परमेश्वराशी तिने उध्दटपणा केला. म्हणून बाबेलला शिक्षा करा.
३०. बाबेलच्या तरुणांना रस्त्यांत ठार केले जाईल. त्याच दिवशी तिचे सर्व सैनिक मरतील.” परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या.
३१. “बाबेल, तू फार गर्विष्ठ आहेस, आणि मी तुझ्या विरुद्ध आहे” आमचा प्रभू, सर्वशक्तिमान परमेश्वर ह्या गोष्टी सांगतो. “मी तुझ्या विरुद्ध आहे, आणि तुझी शिक्षेची वेळ आली आहे.
३२. गर्विष्ठे बाबेल अडखळून पडेल आणि तिला उठायला कोणीही मदत करणार नाही. तिच्यातील गावांत मी आग लावीन. ती आग तिच्याभोवतालच्या प्रत्येकाला भस्मसात करील.”
३३. सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो, “इस्राएल व यहूदा येथील लोक गुलाम झाले आहेत. शत्रूने त्यांना पकडून नेले व तो इस्राएलला सोडणार नाही.
३४. पण परमेश्वर त्या लोकांना परत आणेल. त्याचे नाव आहे ‘सर्वशक्तिमान परमेश्वर देव’ तो समर्थपणे त्या लोकांचे रक्षण करील. त्यामुळे त्या देशाला विश्रांती मिळू शकेल. पण बाबेलच्या लोकांना विश्रांती मिळणार नाही.”
३५. देव म्हणतो, “तलवारी, बाबेलवासीयांना ठार कर. बाबेलमधील राजाच्या अधिकाऱ्यांना व ज्ञानी लोकांना ठार कर.
३६. तलवारी, बाबेलच्या याजकांना आणि खोट्या संदेष्ट्यांना ठार मार, ते मूर्ख माणंसांसारखे होतील. बाबेलच्या सैनिकांना ठार मार, ते सैनिक भीतीने गर्भगळीत झाले आहेत.
३७. तलवारी, बाबेलचे घोडे व रथ नष्ट कर. दुसऱ्या देशांतून आणलेल्या भाडोत्री सैनिकांना मार. ते सैनिक अतिशय घाबरलेल्या स्त्रियांप्रमाणे भयभीत होतील. तलवारी, बाबेलच्या संपत्तीचा नाश कर. ती संपत्ती लुटली जाईल.
३८. तलवारी, बाबेलच्या पाण्याला झळ पोहोचव, तेथील सर्व पाणी सुकून जाईल. बाबेलमध्ये पुष्कळ मूर्ती आहेत त्या मूर्ती बाबेलचे लोक मूर्ख असल्यांचे दर्शवितात म्हणून त्या लोकांचे वाटोळे होईल.
३९. “पुन्हा कधीही बाबेलमध्ये मनुष्यवस्ती होणार नाही. जंगली, कुत्रे, शहामृग, आणि वाळवंटातील इतर प्राणी तेथे राहतील. पण कोणीही मनुष्याप्राणी तेथे पुन्हा कधीही राहणार नाही.
४०. देवाने सदोम, गमोरा आणि त्या भोवतालच्या गावांचा संपूर्ण नाश केला. ती ठिकाणे आता निर्जन झाली आहेत. त्याचप्रमाणे, बाबेलमध्येही कोणी राहणार नाही, आणि तेथे कोणीही वस्ती करायला जाणार नाही.
४१. “पाहा! उत्तरेकडून लोक येत आहेत. ते एका शक्तिशाली राष्ट्रांतून येत आहेत. सर्व जगातील पुष्कळ राजे एकत्र येत आहेत.
४२. त्यांच्या सैन्यांजवळ धनुष्यबाण व भाले आहेत. ते सैनिक क्रूर आहेत. त्यांच्याजवळ दया नाही. ते घोड्यांवर स्वार होऊन येतात. त्या घोड्यांच्या टापांचा आवाज समुद्राच्या गर्जनेप्रमाणे असतो. ते आपापल्या जागा घेऊन लढाईसाठी उभे ठाकतात. बाबेल नगरावर हल्ला करण्यासाठी ते सज्ज आहेत.
४३. बाबेलच्या राजाने ह्या सैन्याबद्दल ऐकले, आणि तो फारच घाबरला. भीतीने त्याचे हातपाय गळून गेले. प्रसून्न होणाऱ्या स्त्रीप्रमाणे त्याला कष्ट झाले.”
४४. परमेश्वर म्हणतो, “कधीतरी, यार्देन नदीजवळच्या दाट झुडुपांतून सिंह येईल, व तो शेतांतील गोठ्यांमध्ये जाईल. मग सर्व गुरे दूर पळून जातील. मी त्या सिंहासारखाच असेन. बाबेलच्या भूमीपासूनच मी बाबेलला हुसकून लावीन. ह्यासाठी मी कोणाची निवड करावी बरे? कोणीही माझ्यासारखा नाही. मला आव्हान देणाराही कोणी नाही. म्हणून मीच हे करीन. मला पळवून लावण्यास कोणीही मेंढपाळ येणार नाही. मी बाबेलच्या लोकांचा पाठलाग करीन.”
४५. बाबेलसाठी परमेश्वराने काय बेत केला आहे तो ऐका. खास्द्यांसाठी परमेश्वराने काय करायचे निश्र्च्ति केले आहे ते ऐका. बाबेलच्या कळपातील (लोकांतील) लहान मुलांना शत्रू फरपटत नेईल. मग बाबेलच्या कुरणांचा संपूर्ण नाश होईल. ह्या घटनेमुळे बाबेलला धक्का बसेल.
४६. बाबेल पडेल, आणि त्यामुळे पृथ्वी हादरेल राष्ट्रांतील लोक बाबेलचा आक्रोश ऐकतील.

स्तोत्र ११९:१२१-१२८
१२१. जे योग्य आहे आणि चांगले आहे तेच मी केले परमेश्वरा, ज्या लोकांना मला त्रास द्यायची इच्छा आहे त्याच्या हाती मला सोडून देऊ नको.
१२२. माझ्याशी चांगला वागशील असे मला वचन दे. परमेश्वरा, मी तुझा सेवक आहे. त्या गर्विष्ठ लोकांना मला त्रास द्यायला लावू नकोस.
१२३. परमेश्वरा, तुझ्या मदतीची आणि तुझ्या चांगल्या शब्दाची वाट बघून माझे डोळे आता शिणले आहेत.
१२४. मी तुझा सेवक आहे. मला तुझे खरे प्रेम दाखव. मला तुझे नियम शिकव.
१२५. मी तुझा सेवक आहे, मला समजून घ्यायला मदत कर म्हणजे मला तुझा करार समजू शकेल.
१२६. परमेश्वरा, आता काही तरी करायची तुझी वेळ आली आहे. लोकांनी तुझे नियम मोडले आहेत.
१२७. परमेश्वरा, शुध्दातल्या शुध्द सोन्यापेक्षा मला तुझ्या आज्ञा आवडतात.
१२८. मी काळजी पूर्वक तुझ्या सर्व आज्ञा पाळतो. मला खोटी शिकवण आवडत नाही.

नीतिसूत्रे २८:६-६
६. गरीब असून प्रामाणिक असणे हे श्रीमंत असून वाईट असण्यापेक्षा चांगले असते.

टायटस १:१-१६
१. देवाचा सेवक व येशू ख्रिस्ताचा प्रेषित पौल याजकडून, देवाच्या निवडलेल्या लोकांच्या विश्वासात त्यांना मदत करण्यासाठी मला पाठविण्यात आले. त्या लोकांना सत्याची ओळख करवून देण्यासाठी मला पाठविले. व ते सत्य लोकांना देवाची सेवा कशी करायची हे दाखविते.
२. तो विश्वास आणि ते ज्ञान अनंतकाळच्या जीवनाच्या आमच्या आशेमुळे येते. काळाची सुरुवात होण्यापूर्वी देवाने त्या जीवनाचे अभिवचन आम्हांला दिले. आणि देव खोटे बोलत नाही.
३. देवाने आपल्या योग्य वेळी त्या जीवनाविषयीचा संदेश जगाला प्रकट केला. देवाने ते काम माझ्यावर सोपविले. त्या गोष्टीविषयी मी संदेश दिला कारण आमच्या तारणाऱ्या देवाने मला तसे करण्याची आज्ञा केली होती.
४. विश्वासातील माझा खरा मुलगा तीत याला मी लिहीत आहे. देव पिता व ख्रिस्त येशू आपला तारणारा याजकडून तुला कृपा, दया व शाति असो.
५. मी तुला क्रेत येथे सोडून या कारणासाठी आलो: की जे अजून अपूर्ण राहिले होते ते तू व्यावस्थित करावेस व मी तुला आज्ञा केल्याप्रमाणे प्रत्येक गावी वडील नेमावेत.
६. ज्याच्यावर दुराचरणाचा दोष नसेल, ज्याला एकच पत्नी असेल, ज्याला मुले असून ती विश्वासणारी असतील. ज्याच्यावर स्वैर जीवन जगल्याचा आरोप नसेल, अशा प्रकारच्या व्यक्तीस नेमावे.
७. कारण अध्पक्ष (सर्वांगीण काळजीवाहक) हा देवाचा कारभारी असल्यामुळे तो दोषी नसावा. तो उद्धट नसावा, त्याला लवकर राग येऊ नये; तो मद्यपान करणारा नसावा, तो भांडणची आवड नसणारां, अप्रामाणिकपणे पैसे मिळविण्याची आवड नसणारा असावा.
८. तर तो आदरातिथ्य करणारा, चांगुलपणावर प्रेम करणारा, शहाणा, नीतिमान, भक्तीशील व स्वत:वर संयम ठेवणारा असावा.
९. विश्वसनीय संदेश जसा तो शिकविला गेला त्याला दृढ धरून राहावे यासाठी की, हितकारक शिक्षणाने लोकांना बोध करण्यास समर्थ असावे. व जे विरोध करतात, त्यांची चूक कौशल्याने त्यांना पटवून द्यावी.
१०. हे महत्त्वाचे आहे कारण पुष्कळ लोक बंड करणारे आहेत. जे व्यर्थ गोष्टीविषयी बडबड करतात व लोकांना फसवितात. मी विशेषेकरून, जे सुंता झालेले आहेत त्यांना संबोधून बोलत आहे.
११. त्यांची तोंडे बंद केलीच पाहिजेत, ज्या गोष्टी शिकवू नयेत त्या ते शिकवीत आहेत. ते हे यासाठी करीत आहेत की, अयोग्य मार्गाने पैसे मिळवावेत. अशा रीतीने ते संपूर्ण घराण्याचा नाश करीत आहेत.
१२. त्यांच्यापैकीच एक क्रेतीय संदेष्टा (भविष्यवादी) स्वत:म्हणाला, ʇक्रेतीय नेहमीच खोटारडे आहेत. दुष्ट पशू आणि आळशी, खादाड आहेत.ʈ
१३. हे वाक्य खरे आहे. म्हणून नेहमीच त्यांना कडक रीतीने धमकाव. यासाठी की, त्यांनी विश्वासात खंबीर व्हावे.
१४. आणि यहूदी भाकडकथा व जे सत्य नाकारतात अशा लोकांच्या आज्ञांकडे लक्ष देऊ नये.
१५. शुद्ध असणाऱ्या सर्वांना, सर्व गोष्टी शुद्ध आहेत; पण ज्यांचे विचार व विवेकभाव ही दोन्हीही पापाने भ्रष्ट झाली आहेत व जे विश्वास ठेवीत नाहीत त्यांना काहीच शुद्ध नाही.
१६. ते देवाला ओळखत असल्याचा दावा करतात, पण ते त्यांच्या कृत्यांनी देवाला ओळखल्याचे नाकारतात. ते अमंगळ व आज्ञा मोडणारे, व कोणतेच चांगले कृत्य करण्यास लायक नसलेले असे त्यांचे त्यांनीच दाखवून दिले आहे.