बायबल निवड
जुना करार
नवीन करार
मराठी बायबल 1826

अनुवाद १८

“लेवी वंशातील लोकांना इस्राएलमध्ये जमिनीत वाटा मिळणार नाही. ते याजक म्हणून काम करतील. परमेश्वरासाठी अग्नीत अर्पण केलेल्या बलींवर त्यांनी निर्वाह करावा. तोच त्यांचा वाटा.

इतर वंशांप्रमाणे लेवींना जमिनीत वाटा नाही. परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे खुद्द परमेश्वरच त्यांचा वाटा आहे.

“यज्ञासाठी गोऱ्हा किंवा मेंढरु मारताना त्या जनावराचा खांद्याचा भाग, गालफडे व कोथळा याजकाला द्यावा.

धान्य, नवीन द्राक्षारस व तेल या आपल्या उत्पन्नातील पहिला वाटाही त्यांना द्यावा. तसेच मेंढरांची पहिल्यांदा कातरलेली लोकरही लेवींना द्यावी.

कारण तुम्हा सर्वांमधून लेवी व त्याच्या वंशजांना तुमचा देव परमेश्वर ह्याने आपल्या निरंतर सेवेसाठी निवडून घेतले आहे.

“प्रत्येक लेवीच्या मंदिरातील सेवेच्या ठराविक वेळा असतील. पण दुसऱ्या कुठल्या वेळेला त्याला काम करायचे असल्यास तो करु शकतो. इस्राएलमध्ये कुठल्याही नगरात राहणारा कुणीही लेवी घर सोडून परमेश्वराच्या पवित्र निवासस्थानी येऊ शकतो. हे केव्हाही करायची त्याला मुभा आहे.

आपल्या इतर बांधवांप्रमाणे त्यानेही तेथे सेवा करावी.

त्याला इतरांप्रमाणेच वाटा मिळेल. शिवाय आपल्या कुटुंबाच्या उत्पन्नात त्याचा वाटा असेलच.

“तुमचा देव परमेश्वर ह्याने दिलेल्या या प्रदेशात राहायला जाल तेव्हा तिकडच्या राष्ट्रातील लोकांप्रमाणे भयंकर कृत्ये करु नका.

१०

आपल्या पोटच्या मुलाबाळांचा यज्ञाची वेदीवर बळी देऊ नका. ज्योतिषी, चेटूक करणारा, मांत्रिक यांच्या नादी लागू नका.

११

वशीकरण करणाऱ्याला थारा देऊ नका. मध्यस्थ, मांत्रिक तुमच्यापैकी कोणी बनू नये. मृतात्म्याशी संवाद करणारा असू नये.

१२

अशा गोष्टी करणाऱ्यांचा तुमचा देव परमेश्वर ह्याला तिरस्कार आहे. म्हणून तर तो इतर राष्ट्रांना तुमच्या वाटेतून बाजूला करत आहे.

१३

तुमचा देव परमेश्वर ह्याच्याशी विश्वासू असा.

१४

“इतर राष्ट्रांना आपल्या भूमीतून हुसकावून लावा. ते लोक मांत्रिक, चेटूककरणारे अशांच्या नादी लागणारे आहेत. पण तुमचा देव परमेश्वर तुम्हाला तसे करु देणार नाही.

१५

तो तुमच्यासाठी संदेष्ट्याला पाठवील. तुमच्यामधूनच तो उदयाला येईल. तो माझ्यासारखा असेल. त्याचे तुम्ही ऐका.

१६

तुमच्या सांगण्यावरुनच देव असे करत आहे. होरेब पर्वताशी तुम्ही सर्व जमलेले असताना तुम्हाला या पर्वतावरील अग्नीची आणि देववाणीची भीती वाटली होती. तेव्हा तुम्ही म्हणालात, ‘पुन्हा हा आमचा देव परमेश्वर ह्याचा आवाज आमच्या कानी न पडो. तसा अग्नीही पुन्हा दृष्टीस न पडो, नाहीतर खचितच आम्ही मरु.!’

१७

“तेव्हा परमेश्वर मला म्हणाला, ‘यांचे म्हणणे ठिकच आहे.

१८

मी यांच्यामधूनच तुझ्यासारखा एक संदेष्टा उभा करीन. माझी वचने त्याच्या मुखाने ऐकवीन. माझ्या आज्ञेप्रमाणे तो लोकांशी बोलेल.

१९

हा संदेष्टा माझ्या वतीने बोलेल. तेव्हा जो कोणी ते ऐकणार नाही त्याला मी शासन करीन.’

२०

“पण हा संदेष्टा मी न सांगितलेले ही काही माझ्या वतीन बोलला, तर त्याला मृत्युदंड दिला पाहिजे. इतर दैवतांच्या वतीने बोलणारा संदेष्टाही कदाचित् निपजेल. त्यालाही ठार मारले पाहिजे.

२१

तुम्ही म्हणाल की अमुक वचन परमेश्वराचे नव्हे हे आम्हाला कसे कळणार?

२२

तर, परमेश्वराच्या वतीने म्हणून तो संदेष्टा काही बोलला व ते प्रत्येक्षात उतरले नाही तर समजा की ते परमेश्वराचे बोलणे नव्हे, तो संदेष्टा स्वत:चेच विचार बोलून दाखवत होता. त्याला तुम्ही घाबरायचे कारण नाही.

Marathi Bible 1826
Public Domain 1826