बायबल एकाच वर्षात
मे 26


1 शमुवेल ४:१-२१
१. इस्राएलभर शमुवेलचे नाव झाले. एली आता फार वृध्द झाला होता. त्याच्या मुलांचे दुर्वर्तन चालूच होते. याच सुमारास सर्व पलिष्टी इस्राएल लोकांविरुध्द एकत्र आले. इस्राएल लोक त्यांच्याशी लढण्यास निघाले. त्यांचा तळ एबन एजर येथे तर पलिष्ट्यांचा अफेक येथे होता.
२. पलिष्टी इस्राएल लोकांवर चालून जायला सज्ज झाले. अशाप्रकारे युद्धाला तोंड लागले. पलिष्ट्यांनी इस्राएल लोकांचा पराभव केला. त्यांचे चार हजार सैनिक मारले.
३. इस्राएली सैनिक आपल्या तळावर परतले तेव्हा वडीलधाऱ्यांनी त्यांना विचारले, “परमेश्वराने का बरे पलिष्ट्यांमार्फत आपला पराभव करवला? आपण शिलोहून परमेश्वराच्या कराराचा कोश येथे आणू या. म्हणजे या लढाईत परमेश्वर आपल्याबरोबर राहील आणि शत्रू पासून आपले संरक्षण करील.”
४. मग त्यांनी शिलो येथे माणसे पाठवली. त्यांनी तो सर्वशक्तिमान परमेश्वराच्या कराराचा कोश आणला. त्या कोशाच्या वरच्या बाजूला करुबांची बैठक होती. परमेश्वराचे ते सिंहासन होते. कोश आणला तेव्हा त्या बरोबर हफनी आणि फिनहास हे एलीचे दोन पुत्रही होते.
५. सैन्याच्या तळावर जेव्हा परमेश्वराच्या कराराचा कोश आणला तेव्हा सर्व इस्राएल लोकांमध्ये एकच जल्लोष झाला. या जयघोषाने भूमीही दणाणली.
६. पलिष्ट्यांपर्यंत हा आवाज पोहोंचला तेव्हा इब्रींच्या छावणीत हा जल्लोष कसला म्हणून ते विचारात पडले.
७. परमेश्वराच्या पवित्र कराराचा कोश छावणीत आणला गेल्याचे त्यांना कळले तेव्हा त्यांची भीतीने गाळण उडाली. ते म्हणू लागले, “त्यांच्या तळावर परमेश्वर आला आहे. आता आपले कसे होणार? असे यापूर्वी कधी झालेले नाही.
८. या शक्तिमान परमेश्वरापासून आता आपल्याला कोण वाचवील, याची धास्ती पडली आहे. मिसरच्या लोकांना नाना तऱ्हेच्या पीडांनी हैराण केले ते याच परमेश्वराने.
९. पण पलिष्ट्यांनो, धीर धरा. मर्दासारखे लढा. पूर्वी हेच इस्राएल लोक आपले गुलाम होते. तेव्हा शौर्य दाखवा, नाहीतर तुम्ही त्यांचे गुलाम व्हाल.”
१०. तेव्हा पलिष्ट्यांनी पराक्रमाची शर्थ करुन इस्राएल लोकांचा पाडाव केला. सर्व इस्राएली सैनिकांनी घाबरुन आपल्या छावणीकडे पळ काढला. त्यांचा तो दारुन पराभव होता. तीस हजार इस्राएली सैनिक मारले गेले.
११. पलिष्ट्यांनी परमेश्वराच्या कराराचा कोश घेतला आणि हफनी आणि फिनहास या एलीच्या मुलांचा वध केला.
१२. त्या दिवशी एक बन्यामीन माणूस युद्धातून धावत निघाला. दु:खाने तो कपडे फाडत होता. डोक्यात धूळ घालून घेत होता.
१३. तो शिलो येथे पोहोंचला तेव्हा एली वेशीजवळ आपल्या आसनावर बसला होता. त्याला कराराच्या कोशाची काळजी वाटत होती म्हणून तो वाट पाहात होता. त्याचवेळी या बन्यामीनाने तेथे येऊन सर्व वृत्तांत सांगितला. लोक तो ऐकून आकांत करु लागले.
१४.
१५.
१६. तो म्हणाला, “मी नुकताच तेथून आलो आहे मी आज युद्धातून पळून आलो आहे.” एलीने त्याला सर्व हकीकत सांगायला सांगितले.
१७. तेव्हा तो म्हणाला, “इस्राएलींनी पळ काढला आहे. इस्राएली सैन्यातील अनेक सैनिक प्राणाला मुकले. तुमची दोन्ही मुले मेली आहेत. आणि परमेश्वराचा पवित्र करारकोश पलिष्ट्यांनी ताब्यात घेतला आहे.
१८. करारकोशाचे वृत्त समजताच वेशीजवळ आसनावर बसलेला एली तिथेच मागच्यामागे पडला आणि त्याची मान मोडली. तो वृध्द आणि स्थूल झाला होता. तात्काळ त्याचा प्राण गेला. वीस वर्षे तो इस्राएलचा शास्ता होता.
१९. एलीची सून, फिनहासची बायको त्यावेळी गरोदर होती. ती प्रसूत व्हायची वेळ येऊन ठेपली होती. कराराचा कोश पळवल्याचे तसेच सासरा व नवरा यांचे निधन झाल्याचे वृत्त तिच्या कानावर आले. ते ऐकताच त्या धक्कयाने तिला कळा येऊ लगल्या आणि ती प्रसूत झाली.
२०. तिच्या मदतीला आलेल्या बायका म्हणाल्या, “आता काळजी करु नको तुला मुलगा झालाय,” पण तिने लक्ष दिले नाही की काही उत्तर दिले नाही. ती फक्त एवढेच म्हणाली, “इस्राएलचे वैभव मावळले.” तिने मुलाचे नाव ईखाबोद असे ठेवले आणि ती गतप्राण झाली.
२१. करारकोशाचे हरण झाले, सासरा व नवरा यांना मृत्यू आला म्हणून तिने मुलाचे नाव ईखाबोद (हरपलेले वैभाव) असे ठेवले.

1 शमुवेल ५:१-१२
१. पलिष्ट्यांनी परमेश्वराचा कोश घेतला. तो एबन-एजर येथून अश्दोद येथे नेला.
२. तो त्यांनी दागोनच्या मंदिरात दागोनच्या जवळ ठेवला.
३. दुसऱ्या दिवशी अश्दोदचे लोक उठून पाहतात तो, दागेनची मूर्ती करार कोशा जवळ जमीनीवर पालथी पडलेली आढळली.
४. पण दुसऱ्या दिवशी पुन्हा त्यांनी ती जमिनीवर पडलेली आढळली अश्दोदच्या लोकांनी ती मूर्ती उचलून पर्ववत ठेवली. यावेळी परमेश्वराच्या पवित्र करारकोशा जवळ पडताना दागोनचे शिर आणि हात तुटून उंबरठ्यावर पडले होते. धड तेवढे शाबूत होते.
५. त्यामुळे अजूनही पुरोहित किंवा इतर लोक अश्दोदला दागोनच्या देवळात शिरतात तेव्हा उंबरठ्यावर पाऊल ठेवत नाही.
६. अश्दोद आणि त्याच्या आसपासचा प्रदेश यातील लोकांना परमेश्वराने सळो की पळो केले. त्यांना हर प्रकार त्रास दिला. लोकांच्या अंगावर गाठी, गळवे आले. शिवाय परमेश्वराने उंदीर सोडून त्यांना हैराण केले. जमीन, गलबतं यावर उंदरानी उच्छाद मांडला, गावातील लोक भयभीत झाले होते.
७. या घटना पाहून अश्दोदचे लोक म्हणाले, “इस्राएलच्या परमेश्वराचा पवित्र करार कोश येथे ठेवण्यात अर्थ नाही. आपल्यावर आणि आपल्या देवावर त्या परमेश्वराचा कोप झाला आहे.”
८. अशदोदच्या लोकांनी पलिष्ट्यांच्या पाचही अधिकाऱ्यांना एकत्र बोलावून या पवित्र कोशाचे काय करावे याविषयी सल्लामसलत केली. अधिकाऱ्यांनी हा पवित्र कोश गेथ येथे हलवायला सांगितला. त्यानुसार पलिष्ट्यांनी तो पवित्र करारकोश हलवला.
९. गथ येथे तो नेऊन ठेवल्यावर त्या शहरावर परमेश्वराचा कोप ओढवला. त्यामुळे तेथील लोक भयभीत झाले. लहान मोठी सगळी माणसे वेगवेगळ्या व्यार्धींनी हैराण झाली. तेथील लोकांच्या अंगावर गळवे उठली.
१०. तेव्हा पलिष्ट्यांनी हा पवित्र कोश एक्रोन येथे हलवला. एक्रोन येथे हा पवित्र कोश येताच तेथील लोक तक्रार करु लागले. “इस्राएलच्या परमेश्वराचा हा पवित्र कोश आमच्या एक्रोनमध्ये आणून आमचा जीव द्यायचा आहे का?” असे ते विचारु लागले.
११. एक्रोनच्या लोकांनी सर्व पलिष्टी अधिकाऱ्यांना एकत्र बोलावून सांगितले “तो पवित्र कोश आमचे बळी घ्यायच्या आधी तो कोश होता तेथे परत पाठवा.” एक्रोनचे लोक फार घाबरले. परमेश्वराने त्यांना त्रस्त करुन सोडले.
१२. अनेक लोक मरण पावले. जे जगले त्यांच्या अंगावर गळवे आली. एक्रोनच्या लोकांच्या आक्रोश आकाशाला भिडला.

स्तोत्र ५४:१-७
१. देवा, तुझ्या अधिकाराचा उपयोग करुन मला वाचव. तुझे महान सामर्थ्य वापर आणि मला मुक्त कर.
२. देवा, माझी प्रार्थना ऐक मी काय म्हणतो ते ऐक.
३. जे देवाची उपासना करत नाहीत असे परके माझ्या विरुध्द गेले आहेत आणि शक्तिशाली लोक मला मारायला निघाले आहेत.
४. पाहा, माझा देव मला मदत करेल. माझा मालक मला साहाय्य करेल.
५. जे लोक माझ्याविरुध्द गेले आहेत त्यांना देव शिक्षा करेल. देव माझ्याशी प्रमाणिक असेल आणि तो त्या लोकांचा नाश करेल.
६. देवा, मी तुला खुशीने अर्पणे देईन. परमेश्वरा, मी तुझ्या चांगल्या नावाची स्तुती करेन.
७. परंतु मी तुला सर्व संकटांतून सोडवण्याची विनंती करीत आहे. माझ्या शत्रूंचा पराभव झाल्याचे मला पाहू दे.

नीतिसूत्रे १५:१२-१३
१२. मूर्खाला तो चुकत आहे हे सांगितलेले आवडत नाही. आणि तो माणूस शहाण्या माणसाला माहिती विचारायला नकार देतो.
१३. माणूस जर आनंदी असला तर त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसेल. पण जर एखादा मनातून दु:खी असला तर त्याचा आत्मा ते दु:ख दाखवेल.

लूक २१:१-१९
१. येशूने वर पाहिले व श्रीमंत लोकांना दानपेटीत दाने टाकताना न्याहाळले.
२. त्याने एका गरीब विधवेलाही तांब्याची दोन नाणी टाकताना पाहिले.
३. तेव्हा तो म्हणाला, “मी तुम्हांला खरे सांगतो, या गरीब विधवेने इतर सर्वांपेक्षा अधिक टाकले. (मी असे म्हणतो)
४. कारण या सर्व लोकांनी आपल्या भरपूर संपत्तीमधून काही भाग दान म्हणून टाकले. परंतु तिने गरीब असून आपल्या उपजीविकेतील सर्वच टाकले.
५. शिष्यातील काही जण मंदिराविषयी असे बोलत होते की, ते सुंदर पाषाणांनी आणि नवसाच्या अर्पणांनी सुशोभित केले आहे. येशू म्हणाला,
६. “या गोष्टी तुम्ही पाहताना असे दिवस येतील की, एकावर एक असा एकही दगड ठेवला जाणार नाही. ते सर्व पाडले जातील.”
७. त्यांनी त्याला प्रश्न विचारला आणि ते म्हणाले, “गुरुजी या गोष्टी केव्हा घडतील? व या गोष्टी घडणार आहेत यासंबंधी कोणते चिन्ह असेल?”
८. आणि तो म्हणाला, “तुम्हांला कोणी फसवू नये म्हणून सावध राहा. कारण माझ्या नावाने पुष्कळ येतील आणि तो “मी आहे’ असे म्हणतील. आणि ते म्हणतील, “वेळ जवळ आली आहे.’ त्यांच्यामागे जाऊ नका!
९. जेव्हा तुम्ही लढाया व दंगे याविषयी ऐकाल तेव्हा घाबरु नका. कारण या गोष्टी घडल्याच पाहिजेत. पण एवढ्यात शेवट होणार नाही.”
१०. मग तो त्यांना म्हणाला, “एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर उठेल, एक राज्य दुसऱ्या राज्यावर उठेल.
११. मोठे भूंकप होतील, दुष्काळ पडतील, आणि वेगवेगळ्या ठिकाणी पीडा उद्भवतील, भितीदायक घटना घडतील. आणि आकाशात मोठी चिन्हे घडतील.
१२. परंतु हे सर्व होण्यापूर्वी ते तुम्हांला अटक करतील. ते तुमचा छळ करतील. चौकशीसाठी ते तुम्हांस सभस्थानांसमोर उभे करतील आणि तुरुंगात टाकतील. माझ्या नावासाठी ते तुम्हांला राजे व राज्यपाल यांच्यासमोर नेतील.
१३. यामुळे तुम्हांला माझ्याविषयी साक्ष देण्याची संधी मिळेल.
१४. “आपला स्वत:चा बचाव कसा करायचा याविषयी काळजी करायची नाही अशी मनाची तयारी करा,
१५. कारण मी तुम्हांला असे शब्द व अशी बुद्धी देईन की ज्यामुळे त्यांना तुमचा विरोध करायला किंवा तुमच्याविरुद्ध बोलायला मुळीच जमणार नाही.
१६. “परंतु आईवडील, भाऊ, नातेवाईक आणि मित्र तुमचा विश्वासघात करतील आणि तुम्हांपैकी काही जणांना ठार मारतील.
१७. माझ्या नावामुळे सर्व जण तुमचा द्वेष करतील.
१८. परंतु तुमच्या डोक्यावरील एक केसही नाहीसा होणार नाही.
१९. आपल्या सहनशीलतेने तुम्ही जिवाचे रक्षण कराल.